Join us

पायलट व्हेईकल देऊ नका, कारण...; Y+ सुरक्षेनंतर अमृता फडणवीस यांची मुंबई पोलिसांना विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 4:35 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना Y+ श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या अगोदर त्यांना 'X'श्रेणीची सुरक्षा देण्यात आली होती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना Y+ श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या अगोदर त्यांना 'X'श्रेणीची सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. यावर अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली. "मला पायलट व्हेईकल देऊ नका, असं फडणवीस यांनी सांगितले आहे.

"मला मुंबईच्या सामान्य नागरिकांप्रमाणे जगण्याची इच्छा आहे. माझी नम्र विनंती @मुंबई पोलीस, मला ट्रॅफिक क्लीयरन्स पायलट वाहन देऊ नका. मुंबईतील रहदारीची स्थिती निराशाजनक आहे, पण मला खात्री आहे, हे सरकार लवकरच यावर उपाय काढेल, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. 

अमृता फडणवीस यांना 'Y+' सुरक्षा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...

अमृता फडणवीस यांना ट्रॅफिक क्लिअरन्स वाहनाची सुविधा देण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. ट्रॅफिक क्लिअरन्स वाहन प्रवास करताना पायलट वाहन म्हणून काम करते. महाराष्ट्राच्या गृह विभागाने यासंदर्भात निर्णय घेतला होता.

अमृता फडणवीस यांना 'Y+' सुरक्षा

 

अमृता फडणवीस यांना Y+ सुरक्षा मिळाल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी एस्कॉर्ट वाहनासह ५ पोलीस कर्मचारी चोवीस तास तैनात असणार आहेत. मुंबई पोलिसांच्या संरक्षण आणि सुरक्षा विभागाने या संदर्भात वाहतूक विभागाला आवश्यक सूचना दिलेल्या आहेत. पण, अमृता फडणवीस यांनी सध्या ट्रॅफिक क्लिअरन्स वाहनाचा वापर सुरू केलेला नाही. ट्रॅफिक क्लिअरन्स वाहनाची सुविधा घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीलाच दिली जाते, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे."अमृता फडणवीस यांनी सुरक्षा वाढवण्याची मागणी केली नव्हती. धोक्याची भीती लक्षात घेऊन उच्चाधिकार समितीने सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रॅफिक क्लिअरन्स वाहनाचा अर्जही दिला नसल्याचे फडणवीस म्हणाले. ठाकरे कुटुंबीय आणि इतरांना यापूर्वी अशा सुविधा दिल्या होत्या. ही सुविधा पदासाठी नाही, तर धोक्याची भीती लक्षात घेऊन दिली जात असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :अमृता फडणवीसदेवेंद्र फडणवीसपोलिस