तुम्ही धीर सोडू नका, आम्ही तुमच्या पाठीशी; एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 12:09 PM2022-10-26T12:09:51+5:302022-10-26T12:10:01+5:30

बळीराजाला चांगले दिवस येवू दे अशी प्रार्थना करीत मुख्यमंत्र्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

Don't give up, we are with you; CM Eknath Shinde celebrated Diwali with farmers | तुम्ही धीर सोडू नका, आम्ही तुमच्या पाठीशी; एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी

तुम्ही धीर सोडू नका, आम्ही तुमच्या पाठीशी; एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी

googlenewsNext

मुंबई: दीपावली निमित्त राज्यभर प्रकाशपर्व साजरे होत असताना मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्याने मंगळवारी अनोखी दिवाळी अनुभवली. राज्यातून आलेल्या शेतकरी कुटुंबियांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब दिवाळी साजरी केली. त्यांच्यासोबत फराळाचा आस्वाद घेतला. आलेल्या प्रत्येक शेतकरी कुटुंबाचे औक्षण करीत त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित केला.

राज्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि कृती विकास आराखडा तयार करीत असल्याचे सांगतानाच नैसर्गिक आपत्तीत सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्ही धीर सोडू नका. राज्य शासन तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
राज्यातील शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेतला आणि त्याची तातडीने अंमलबजावणी केल्याचे एकानाथ शिंदेंनी सांगितले. 
 
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत एकाच वेळी ७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २५०० कोटी रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्यात आली. सेंद्रीय शेतीवर भर देतानाच विविध सिंचन प्रकल्पांच्या कामांना मंजूरी देऊन लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकरी आणि कृषि विकासासाठी घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती एकनाथ शिंदेंनी यावेळी दिली.

दरम्यान, शेतकरी बांधवांनी पारंपारिक शेतीला आधुनिकतेचे बळ देऊन कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी शेती करण्याचे आवाहन एकनाथ शिंदेंनी यावेळी केले. बळीराजाला चांगले दिवस येवू दे अशी प्रार्थना करीत मुख्यमंत्र्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात दुधे दाम्पत्याला दिवाळी फराळ भरवला. वर्षावरील हिरवळीवर शेतकऱ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. 

Web Title: Don't give up, we are with you; CM Eknath Shinde celebrated Diwali with farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.