मूत्रपिंडांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:06 AM2021-06-17T04:06:34+5:302021-06-17T04:06:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: कोरोना काळात मूत्रपिंडावर परिणाम होऊन रुग्णांच्या प्रकृतीवर प्रदीर्घ काळ परिणाम झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: कोरोना काळात मूत्रपिंडावर परिणाम होऊन रुग्णांच्या प्रकृतीवर प्रदीर्घ काळ परिणाम झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे कोरोनामुक्तीनंतरही आता रुग्णांनीही मूत्रपिंडाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
किडनीचा सौम्य आजार असणाऱ्या व्यक्तींना कोरोना संसर्गाच्या आधी डायलिसिसची गरज भासत नव्हती; मात्र कोरोना संसर्गानंतर त्यांना डायलिसिसची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल केलेल्या कोरोना रुग्णांपैकी २ टक्के रुग्णांच्या किडनीवर गंभीर परिणाम झाला आहे.
किडनीचा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास...
कोरोनाचा विषाणू मूत्रपिंडावर थेट संसर्ग होतो. त्यामुळे रक्त प्रवाहात गुठळ्या तयार होतात आणि या गुठळ्यांमुळे रक्त वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो.
किडनीचे कार्य सुरळीत होत नाही. मूत्रपिंडाच्या सेलमध्ये कोरोनाचा प्रवेश झाल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. मूत्रपिंडाच्या आजारावर आता मोठ्या प्रमाणावर उपचार उपलब्ध आहेत. काही साध्या व सोप्या चाचण्यांच्या आधारे हे आजार ओळखून त्यावर उपचार शक्य आहेत. आजाराचे निदान करून त्वरित उपचार करण्यासाठी रुग्णाला लवकर मूत्रपिंडतज्ज्ञ डॉक्टरकडे घेऊन जाणे गरजेचे असते.
स्टेरॉइडचा वापर करताना सावध
मूत्रपिंडाचा आजार असलेल्या रुग्णांना कोरोना संसर्ग झाल्यास अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. औषधे घेताना फॅमिली डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी किंवा उपचार करण्यासाठी स्टेरॉइड औषधे आवश्यक आहेत, परंतु ही औषधे घेतल्याने किडनीवर अधिक परिणाम होण्याची भीती असते. स्टेरॉइडमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी, तसेच अँटिबायोटिक औषधे घेण्यासाठी फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
कोरोना संसर्गावर उपचार घेत असतानाही डॉक्टरांनी सुचविलेली औषधे त्यांनी ठरवून दिलेले प्रमाण आणि वेळेनुसार घेणे अत्यावश्यक आहे.
कोरोनाचे एकूण रुग्ण - ७१८५१३
बरे झालेले रुग्ण - ६८६१२५
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - १४९०७
एकूण मृत्यू - १५२२७
उपचार शक्य
- डॉ. अगस्त्य पाटील, मूत्रपिंडविकारतज्ज्ञ
मूत्रपिंडाचे आजार असणाऱ्यांना स्टेरॉईडचा वापर, अँटिबायोटिक्सच्या अतिवापरामुळे जीवाला धोका असतो. शिवाय मूत्रपिंडाचे आजार असलेल्या रुग्णांना कोरोना संसर्ग झाला तरीही त्यावर उपचार शक्य आहेत; मात्र त्याकरिता लवकर निदान होणे गरजेचे आहे.