Join us

प्रेमपत्र दिल्यासारखं नोटीसा नका काढू, सुषमा अंधारेंच्या निशाण्यावर महिला आयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 11:30 PM

मीही तक्रारासाठी दोन वेळा फोन केलेला, पण रुपाली चाकणकर यांनी फोन उचलला नाही, असे अंधारे यांनी म्हटले. 

मुंबई - शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने तात्काळ याची दखल घेतली. यावरुन सुषमा अंधारे यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. तसेच, सुप्रिया सुळेंबद्दल सत्तार यांनी केलेल्या विधानाचा निषेध करताना, मी अगोदर पक्षाची नेता म्हणून नाही, तर स्त्री म्हणून याठिकाणी आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले. मीही तक्रारासाठी दोन वेळा फोन केलेला, पण रुपाली चाकणकर यांनी फोन उचलला नाही, असे अंधारे यांनी म्हटले. 

मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर कारावाईसाठी मी दोनवेळा रुपाली चाकणकर यांना फोन केला होता, पण त्यांनी फोन उचलला नाही, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. काही दिवसापूर्वी सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी 'नटी' या शब्दाचा वापर केला होता. या वक्तव्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू होते. तर, सोमवारी अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबद्दल अपशब्द वापरला. त्यानंतर, राष्ट्रवादीकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही सत्तारांवर निशाणा साधला. याप्रकरणी शिवसेनेच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांनीही भूमिका मांडली. त्यावेळी, महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

मी महिला आयोगावर टीका करत नाही. पण, आयोगाच्या ही बाब लक्षात आणून देतेय की, जर गुलाब पाटलांबाबत आपण ४ दिवसांपूर्वीच नोटीस काढली असती. किंवा संभाजी भिडेंनाही आपण अगोदरच नोटीस बजावली असती, तर गुलाब पाटलांचं प्रकरण घडलं नसतं. प्रेम पत्र दिल्याारखं नोटीशी नका हो काढू, नोटीशी काढण्याचा अर्थ त्याच्या तक्रारी दाखल झाल्या पाहिजेत, त्याचे फॉलोअप घेतले पाहिजेत, असे म्हणत शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. 

दरम्यान, रुपाली चाकणकरांना मी दोन तीनवेळा फोन केला, पण माझा फोन उचलला गेला नाही, असेही सुषमा अंधारे यांनी सांगितले. 

टॅग्स :रुपाली चाकणकरसुषमा अंधारेशिवसेनाअब्दुल सत्तार