मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 11:22 AM2024-11-26T11:22:02+5:302024-11-26T11:22:47+5:30
हा संपूर्ण व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यावर अनेक मराठी लोक संताप व्यक्त करत आहेत.
मुंबई - मला मराठी येत नाही, तुम्ही हिंदीत बोला. मी माफी मागणार नाही असं विधान एका रेल्वे कर्मचाऱ्याने केले आहे. मुंबईत पुन्हा एकदा मराठी भाषेचा अवमान होणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतल्या नाहूर रेल्वे स्टेशनवर तिकिट घेणाऱ्या मराठी माणसाने मराठीचा आग्रह धरला असता तिकीट विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्याने हिंदीत बोला असं म्हटल्याने मराठी माणसाचा संताप अनावर झाला.
मराठी एकीकरण समितीच्या फेसबुक पोस्टवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. १.४० मिनिटांच्या या व्हिडिओत मराठी प्रवाशी आणि रेल्वे कर्मचाऱ्याचा संवाद रेकॉर्ड करण्यात आला आहे. यात प्रवाशी मोबाईल रेकॉर्डिंग करत असताना म्हणतायेत की, आता तू मवाळ भाषेत का बोलतो, मगाशी मला हिंदी भाषेत बोलण्यास सांगत होता. तेव्हा रेल्वे कर्मचारी मला मराठी येत नाही मग मी कसं बोलणार, मला येत नाही कसं बोलणार असं तो म्हणतो. त्यावर तुझं नाव काय, बक्कल कुठे आहे असा सवाल प्रवाशी करतो.
त्यावर संतापून रेल्वे कर्मचारी तुम्हाला काही अधिकार नाहीत, मी माझं नाव तुम्हाला दाखवू. तुमच्याकडे काही अधिकार नाही मी तुम्हाला माझी ओळख सांगू. त्यावर तुझं नाव काय असं प्रवाशी विचारतोय. त्याला तुम्हाला जे करायचे ते करा, रांग लागलीय तुम्ही बाजूला उभे राहा असं सांगतो. त्यावर तू मला हिंदीत बोलायला का लावतोस, तू माझी माफी माग अशी मागणी मराठी प्रवाशी रेल्वे कर्मचाऱ्याकडे करतो. त्यावर मी माफी मागणार नाही. मला मराठी येत नाही तुम्ही हिंदीत बोला एवढेच मी बोललोय. त्यावर इतर मराठी प्रवासी सगळ्यांनाच हिंदी येते असं नाही म्हणून कर्मचाऱ्याला सांगतात. हा संपूर्ण व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यावर अनेक मराठी लोक संताप व्यक्त करत आहेत.
याआधीही नालासोपारा इथं मराठी तिकीट तपासनीसाने मराठी जोडप्याची अडवणूक केल्याचा प्रकार घडला होता. मराठी बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या त्या तपासनीसाला व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर निलंबित करण्यात आले होते. मुंबईत वारंवार मराठी माणसांचा अवमान करणारे प्रकार घडले आहेत. त्यात मराठी माणसाला नोकरी नाकारणे, मराठी माणसाला घर नाकारणे यासारखे प्रकार उघडकीस आले.