Join us

लॉकडाऊन संपला तरी मुलांना घराबाहेर सोडू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशातील रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशातील रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. या लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसणार असल्याचा अंदाजही अनेक जणांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपला तरी मुलांना घराबाहेर न पाठविण्याचे आव्हान पालकांना आणखी काही दिवस पेलावे लागणार आहे.

दुसऱ्या लाटेत केवळ ज्येष्ठ नागरिक, सहव्याधीग्रस्त किंवा मध्यमवयीन व्यक्तीच नव्हे तर १८ वर्षांखालील मुलांनाही कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेत तर सर्वाधिक धोका हा लहान मुलांना असल्याचा इशारा देण्यात आला आहे. परंतु, या वयोगटाला लससंरक्षण नसल्याने त्यांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. लॉकडाऊन संपला तरी मुलांना घराबाहेर न पाठवणे हाच एक उपाय सध्या दिसून येत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

………….

मुंबईतील एकूण रुग्ण - ६,९०,८८९

कोरोनामुक्त रुग्ण - ६,४१,५९८

१८ वर्षांखालील रुग्ण - ३५ हजार

१० वर्षांखालील रुग्ण - १० हजार

........................

लहान मुलांमध्ये आढळणारी कोरोनाची लक्षणे

१) ताप, कोरडा खोकला, घसा खवखवणे

२) धाप लागणे, तोंडाची चव जाणे, वास येणे बंद होणे

३) पोट बिघडणे, उलट्या होणे, डोकेदुखी, बेशुद्ध पडणे

४) सतत चिडचिड, त्रागा करणे, अंगावर पुरळ येणे, डोळे लाल होणे

५) हात किंवा पायाची नखे, बोटांवर निळसर चट्टे येणे

...............

लहान मुले कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण वाढत असले तरी त्यांच्यातील लक्षणे ही अत्यंत सौम्य स्वरूपाची आहेत. अनेकवेळा त्यांना कोरोना झाल्याचे कळतही नाही. मुले ही घरात एका जागी स्थिर राहत नाहीत. शेजारी अथवा परिसरातील मुलांमध्ये ती मिसळतात. त्यामुळे त्यांच्यापासून संसर्गप्रसार होण्याचा धोका आहे. अशावेळी कोरोनाबाधित मुलांना एका खोलीत बसवून ठेवणे, घरातील वयोवृद्धांशी त्यांचा संपर्क होऊ न देण्याचे आव्हान पालकांपुढे आहे.

- डॉ. दिनेश सोळुंके, बालरोग तज्ज्ञ

..........

बहुतेक मुलांमध्ये अगदी सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. चव किंवा वास येणे थांबल्याचे लहान मुलांना सांगता येणार नाही. पण मुलांची अन्नावरची वासना अचानक जाणे, त्यांनी खाणे कमी करणे अशाप्रकारची लक्षणे असू शकतात. लहान मुले कोरोनातून लवकर बरी होत असली तरी काळजी घेण्याची गरज आहे.

- डॉ. नीतू वर्मा, बालरोग तज्ज्ञ

............

बाळ वा लहान मूल आजारी पडल्यास आई किंवा वडील यापैकी एकानेच त्याच्याजवळ थांबून काळजी घ्यावी. त्यामुळे घरातल्या इतर सदस्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी होते. आजारी बाळासोबत असणाऱ्या पालकाने मास्क वापरावा.

- डॉ. पलक बॅनर्जी, बालरोग तज्ज्ञ

..............

संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून तयारी

सध्यातरी मुंबईत लहान मुले बाधित होण्याचे प्रमाण फारसे नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून लहान मुलांसाठी विशेष विलगीकरण व्यवस्था उभारण्याचे नियोजन पालिका करीत आहे. त्यासाठी वेगळी टास्क फोर्स तयार केली आहे. येत्या काळात नवीन जम्बो कोविड केंद्रे उभारण्याची गरज भासल्यास त्यात लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याचेही विचाराधीन आहे, अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.