मुंबई : कोट्यवधी रुपये पालिकेकडून खर्च करूनही बशीसारखा आकार असलेली मुंबई दरवर्षी पावसाळ्यात तुंबते. यंदा मुंबई तुंबू नये यासाठी पालिकेने दोन महिन्यांपासून कंबर कसली आहे. पावसाळा पूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मंगळवारी बैठक बोलाविली होती. मुंबईसारख्या मेगासिटीमध्ये पुराचा धोका टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी यंदा पावसाळापूर्व कामांमध्ये चोख भूमिका बजावावी, त्यासाठी विविध यंत्रणांनी सज्ज राहावे. पावसाळ्याच्या कालावधीत योग्य पद्धतीने योगदान दिल्यास शहरावर येणारे संकट टाळता येईल अशा शब्दांत आयुक्तांनी प्रशासनाला बजावले.
रस्ते खोदता येणार नाहीत मुंबई शहर आणि उपनगरांत १५ मेनंतर रस्त्यांवर खोदकामासाठी कोणतीही परवानगी देऊ नये, अशा सूचना आयुक्त चहल यांनी सर्व यंत्रणांना दिल्या. आपत्कालीन परिस्थितीतच ही परवानगी देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबईतील ९ मीटर रस्त्यांची जबाबदारी ही स्थानिक पातळीवर सहायक आयुक्तांची असेल. याचा निर्णय नुकताच घेण्यात आला असून, यापुढे ९ मीटरपेक्षा कमी रस्त्यांची देखभालीची जबाबदारी सहायक आयुक्तांकडे असेल, असेही चहल यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील ४८० ठिकाणी पाणी उपसा करणारे पंप अतिवृष्टीच्या काळात पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाणी उपसा करणारे पंप हे शहर आणि उपनगरात ४८० ठिकाणी लावण्यात येणार आहेत. तसेच या पंपांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नियंत्रण असणार आहे. आयुक्त चहल यांनी पंप ऑपरेटिंगची जबाबदारी असणाऱ्या संबंधितांची यादी सार्वजनिकरीत्या जाहीर करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या. तसेच पाणी साचण्याच्या परिस्थितीत पंप योग्य पद्धतीने काम करतील याची पूर्वतयारी म्हणून मॉक ड्रिलचे निर्देशही दिले.
पावसाळी आजारांसाठी तीन हजार बेड आगामी पावसाळी आजारांसाठीची तयारी म्हणून तीन हजार बेड राखीव ठेवले आहेत. त्यासोबतच पाण्यामुळे होणाऱ्या आजारांसाठी नमुने घेण्याचीही व्यवस्था केली आहे. हिवताप (मलेरिया), डेंग्यू नियंत्रणासाठीची बैठक नुकतीच पार पडली असून जनजागृतीसाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आयुक्तांचे निर्देश -- शहर आणि उपनगरात ४८० उपसा पंप लावणार- १५ मेनंतर रस्त्यांवर खोदकामासाठी परवानगी नाही- ९ मीटर रस्त्यांची जबाबदारी सहायक आयुक्तांची- आजारांसाठी तीन हजार बेड राखीव- नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांची वेळोवेळी पाहणी
लोकलवर परिणाम होणार नाही, याची काळजी घ्या -रेल्वे आणि पालिकेने गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात समन्वय साधून कामे केल्याने लोकल सेवा अव्याहतपणे सुरू होती.
रेल्वे हद्दीमध्ये मायक्रो टनेलिंग आणि कलव्हर्टच्या सफाईची कामे योग्य पद्धतीने झाल्यानेच हे शक्य झाले. त्याचबरोबर पावसाच्या पाण्याचा संथगतीने निचरा होणाऱ्या ठिकाणी भूमिगत जल-साठवण टाक्यांची उभारणी केली.
या ठिकाणी रेल्वे आणि रस्ते वाहतूक थांबली नाही. यंदाही त्याच धर्तीवर उत्तम समन्वयाने काम करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. रेल्वे परिसरातील वृक्ष छाटणी मोहीम मे महिन्याच्या अखेरीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी उद्यान विभागाला दिल्या. गाळ काढण्याच्या कामांची पाहणी करा अनेक लोकप्रतिनिधींनी मुंबई शहर आणि उपनगरात नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांची तपासणी करण्याच्या कामांचा पाहणी दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यातून मिळणाऱ्या सूचना आणि माहिती याकडे गांभीर्याने लक्ष देऊन विभागीय पातळीवर सहायक आयुक्त आणि उपायुक्त यांनी दौरा करावा. नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांची वेळोवेळी पाहणी करावी, असेही निर्देश आयुक्त चहल यांनी यावेळी दिले.