Join us

दिल्लीतून राज्य चालवू देऊ नका, महाराष्ट्रात आघाडी सरकारच हवे - मल्लिकार्जुन खरगे 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 8:33 AM

माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसतर्फे षण्मुखानंद सभागृहात आयोजित सद्भावना दिवस व संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.

मुंबई : महाराष्ट्रातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या जोडीला दिल्लीतून राज्य चालवू देऊ नका, असे आवाहन करत राज्याला महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखालील मजबूत सरकारची गरज आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी केले.

माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसतर्फे षण्मुखानंद सभागृहात आयोजित सद्भावना दिवस व संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याला शरद पवार तसेच उद्धव ठाकरेही उपस्थित होते. मोदी आणि शहा यांच्याकडे महाराष्ट्र गहाण ठेवू नका. त्यांना दिल्लीतून महाराष्ट्र चालवायचा आहे. महाराष्ट्र दिल्लीतून नव्हे तर राज्यातील जनतेने चालवला पाहिजे. भाजप विषापेक्षा कमी नाही, त्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राबाहेर फेकून दिले पाहिजे, असेही खरगे म्हणाले.

...तर त्यांनी संविधान बदलायला घेतले असते लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदीना हुकूमशहा बनण्यापासून रोखल्यामुळे मी राज्यातील जनतेचे अभिनंदन करतो. भाजपला दोन तृतीयांश बहुमत मिळाले असते तर त्यांनी आतापर्यंत संविधान बदलायला घेतले असते. पण आता हे सरकार फार काळ चालणार नाही, लवकर पडेल असेही खरगे म्हणाले. 

नेहरूंचे योगदान पुसता येणार नाही : शरद पवार देशाच्या स्वातंत्र्यानंतर एक नवी पिढी देश सावरण्यासाठी काँग्रेसचे नेतृत्व हातात घेऊन यशस्वी झाली, त्यात राजीव गांधींचा उल्लेख प्रकर्षान करावा लागेल. नेहरू आणि त्यांच्या कुटुंबाचे योगदान कुणीही पुसू शकत नाही, असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले. 

राजीवजी कळायला वेळ लागला : उद्धव ठाकरे माणसे कळायला वेळ लागतो. राजीवजी कळायला वेळ लागला, असे उद्‌गार उद्धव ठाकरे यांनी काढले. राजीव गांधींनी कोणताही नारा न देता लोकसभेत चारशे पार करून दाखवले. त्यांनी देशाला मजबूत सरकार दिले. त्यांनी संविधान बदलले नाही, पण सत्तेचे विकेंद्रीकरण केले, असा टोलाही भाजपला लगावला.

टॅग्स :मल्लिकार्जुन खर्गेकाँग्रेस