मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असतानाही नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरत आहेत. अशात, पोलिसांना संयमाने कारवाई करण्याच्या सूचना आहेत; पण त्यांना कडक पावले उचलण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा देत मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी नागरिकांना नियमांचे पालन करीत, पोलिसांना सहकार्य करा, असे आवाहन केले आहे. नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पाहून आता आणखी कठोर निर्बंध लागू करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. त्यानुसार सर्व पोलीस ठाण्यांना त्याबाबत सांगण्यात आले असल्याचे नगराळे यांनी नमूद केले.पोलीस उपायुक्तांकडून सकाळी ११ ते दुपारी १२ पर्यंत, तसेच सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान गर्दीच्या ठिकाणावरील फाेटाे मागविण्यात आले आहेत. त्यानुसार त्या भागात अतिरिक्त फाैजफाटा तैनात करण्यात येणार आहे, तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवरही कारवाई वाढविण्यात येणार आहे. झूम मीटिंगद्वारे पोलिसांसोबत बैठक घेत त्यांना कारवाईबाबत मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
५५ वर्षांवरील कर्मचारी, अधिकारी पोलीस ठाण्यातगेल्या वेळेस ५५ वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना घरी थांबविण्यात आले होते. मात्र, सध्या अशा पोलिसांना पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. फील्ड वर्कसाठी जास्तीत जास्त तरुण पोलिसांवर जबाबदारी देण्यात येत आहे. दरम्यान, गावाकडे निघालेल्या मजुरांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी लाेकमान्य टिळक टर्मिनस येथे स्थानिक पोलीस आणि एसआरपीएफचे जवान तेथे तैनात आहेत. कडक निर्बंधांच्या काळात कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही आयुक्तांनी केले.