मुख्यमंत्र्यांचे आवाहन; लॉकडाऊन नको, तर बंधने पाळा !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 06:03 AM2021-03-12T06:03:36+5:302021-03-12T06:03:52+5:30

मुख्यमंत्र्यांचे आवाहन; गुरुवारी १४ हजार नव्या रुग्णांची भर

Don't lock down, follow the restrictions! | मुख्यमंत्र्यांचे आवाहन; लॉकडाऊन नको, तर बंधने पाळा !

मुख्यमंत्र्यांचे आवाहन; लॉकडाऊन नको, तर बंधने पाळा !

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्यमंत्री ठाकरे यांनी गुरुवारी रात्री फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत कोरोनाचे गांभीर्य पुन्हा अधोरेखित केले

नागपुरात कडक लॉकडाऊन लागू
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता नागपूर शहरात १५ मार्च ते २१ मार्चदरम्यान कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पत्रपरिषदेत ही घोषणा केली. या काळात संचारबंदी लागू राहील. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.

मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून सर्वांनीच सतर्क राहण्याची गरज आहे. ब्राझिलसह इतर देशांत आलेली कोरोनाची दुसरी लाट भयंकर आहे. लॉकडाऊन कुणालाच नको आहे. मात्र, त्यासाठी स्वत:हून बंधने पाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले. दरम्यान, गुरुवारी दिवसभरात १४ हजार ३१८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. सलग दुसऱ्या दिवशी दहा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाल्याने चिंता वाढली असून काही शहरांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  

मुख्यमंत्री ठाकरे यांनी गुरुवारी रात्री फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत कोरोनाचे गांभीर्य पुन्हा अधोरेखित केले. मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सचे पालन करणे, वारंवार हात धुणे आणि लक्षणे आढळल्यास तत्काळ चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. 
 गुरुवारी राज्यात १४३१७ नवीन रुग्ण सापडल्याने चिंता वाढली. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्येनेही एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. दिवसभरात ७१९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. फेब्रुवारीपर्यंत आटोक्यात असलेली कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सर्वाधिक रुग्णवाढ नागपूर येथे १७०१ एवढी आहे. त्याखालोखाल पुण्यात १५१४ आणि मुंबईत १५०८ रुग्ण आहेत. नाशिक जिल्ह्यात बुधवारपासून बाजारपेठा व सर्व दुकाने सायंकाळी ७ नंतरच बंद ठेवण्यात येत आहेत.

‘मी लस घेतली तुम्हीही घ्या’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी जेजे रुग्णालय येथे जाऊन कोरोना प्रतिबंधक 
लस घेतली. याच वेळी रश्मी ठाकरे यांनीही लस घेतली.
मुख्यमंत्री  म्हणाले...
लस घेण्यात कोणतीही भीती नाही. जे पात्र आहेत त्या प्रत्येकाने लस घ्यावी. 

टॉप टेनमध्ये आठ जिल्हे
देशात कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेल्या पहिल्या दहा जिल्ह्यात राज्यातील आठ जिल्हे आहेत. 

पुणे         २१२७६ 
नागपूर         १३८०० 
ठाणे         १०८२४ 
मुंबई         १०५६३ 
नाशिक         ५३८४
जळगाव         ५०४२
औरंगाबाद         ४९१५
अमरावती         ४४६१

मुंबईत दुसऱ्या दिवशीही दीड हजार बाधित
मुंबईत गुरुवारी १ हजार ५०८ रुग्णांची नोंद झाली असून ४ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या ३ लाख ३८ हजार ६३१ झाली असून मृतांचा आकडा ११ हजार ९६९ झाला आहे.

महाराष्ट्राबाबत केंद्र सरकार चिंतेत
महाराष्ट्राबाबत आम्ही फार चिंतेत आहोत. महाराष्ट्रात वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव हा गंभीर प्रश्न आहे. कोरोनामुक्त व्हायचे असेल तर कोरोनासंबंधी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावेच लागेल, असे नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल यांनी पत्रकारांना सांगितले

देशात सापडले सर्वाधिक नवे कोरोना रुग्ण
देशात यंदाच्या वर्षीची कोरोनाच्या नव्या रुग्णांची सर्वाधिक संख्या गुरुवारी आढळून आली. या दिवशी २२८५४ नवे रुग्ण सापडले व १२६ जणांचा बळी गेला. उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या प्रमाणातही वृद्धी होऊन ते १.६८ टक्के झाले आहे. याआधी २५ डिसेंबर रोजी २३,०६७ इतके कोरोनाचे सर्वाधिक नवे रुग्ण आढळून आले होते.
 

Web Title: Don't lock down, follow the restrictions!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.