पुन्हा लॉकडाऊन नकाे; राज्य सरकारला आदेश द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:16 AM2020-12-04T04:16:03+5:302020-12-04T04:16:03+5:30
याचिका : एक लाखाची अनामत रक्कम जमा करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना महामारीत कोणत्याही ...
याचिका : एक लाखाची अनामत रक्कम जमा करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना महामारीत कोणत्याही प्रकारचे निर्बंध घालण्याची आवश्यकता नाही, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. मात्र, उच्च न्यायालयाने याचिककर्त्यांना या याचिकेवर सुनावणी घेण्यापूर्वी एक लाख रुपये अनामत रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले.
व्यवसायाने वकील असलेले हर्षल मिराशी यांनी ही याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी घेण्यापूर्वी मिराशी यांना न्यायालयाच्या निबंधकांकडे एक लाख रुपये जमा करावे लागतील.
मिराशी यांनी महामारी कायदा,१८९८ला आव्हान देत त्याच्या अंमलबजावणीवर स्थगिती देण्याची विनंती केली आहे. तसेच लॉकडाऊनचे निर्बंध हटविण्यात यावेत, तसेच सरकारला पुन्हा लॉकडाऊन लागू न करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकेद्वारे केली.
कोरोना हा केवळ एक प्रकारचा ताप आहे. लोकांच्या मनात भीती निर्माण करून काही घटकांना नफा मिळवून देण्यासाठी रुग्णांची संख्या वाढवून सांगण्यात आली. लोकांचे अलगीकरण करणे म्हणजे त्यांच्या मूलभूत अधिकारांचा भंग केल्याप्रमाणे आहे. त्यामुळे मानसिक समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच अनेक लोकांना त्यांचा रोजगार गमवावा लागला, असेही याचिकेत नमूद आहे.
.....................