Join us  

Uddhav Thackeray: अच्छे दिनाच्या केवळ थापाच, राजकारण करा पण...; उद्धव ठाकरेंची टोलेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2022 7:18 AM

गोरेगाव पूर्व येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यानात शनिवारी सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेच्या सर्वांसाठी पाणी या नवीन धोरणाचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सर्वांसाठी पाणी हेच आपले धोरण आहे आणि तो आपला धर्म आहे. आम्हाला पाणी देण्याच्या कामात राजकारण आणायचे नाही. मात्र घरात नळ देणाऱ्यांनी आश्वासनांच्या तोट्या दिल्या. ही गोष्ट चालणार नाही. अच्छे दिन देणार या थापा मारल्या गेल्या. ही थापेबाजी परवडणारी नाही. थापेबाजी एकदा, दोनदा, तीनदा चालेल. लोक सतत या थापा सहन करू शकत नाही. लोकांनी आपल्या मत दिले आहे. सरकार नालायक निघत असले तर त्यांना जाब विचारण्याचा अधिकार आहे, असे म्हणत राजकारण करा; पण राजकारणाचा एक दर्जा असावा, अशी टिप्पणी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून घसरलेल्या राजकारणाच्या दर्जावर खंत व्यक्त केली.

गोरेगाव पूर्व येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यानात शनिवारी सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेच्या सर्वांसाठी पाणी या नवीन धोरणाचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. ठाकरे म्हणाले की, गेले काही दिवस माणसात आल्यासारखे वाटत आहे. बरेच दिवसांनी आपण माईकसमोर बोलू लागलो आहोत. आपल्या मुंबईसाठी विविध योजना आणत आहोत. 

आपण गेल्या दिवसांपूर्वी बेस्टसाठी एक तिकीट केले. हे तिकीट निवडणूक सोडून तुम्हाला सगळीकडे वापरता येईल. हे स्पष्ट केलेले बरे असते. नाही तर बेस्टचे तिकीट आणाल आणि याल निवडणुकीमध्ये, मात्र तसे नाही, अशी खोचक टिप्पणी ठाकरे यांनी केली. 

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईच्या हक्काचा माणूस आज मुख्यमंत्री झाला आहे. मुंबईकरांसाठी हा माणूस हा चांगले काम करत असतो. आजचा क्षण मुंबईकरांसाठी चांगला आहे. कारण आपण सर्वांसाठी पाणी हे नवीन धोरण राबवित आहोत. यावेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचीही भाषणे झाली.

 १४ तारखेला  मनातले बोलणारमुंबई महापालिकेच्या सर्वांसाठी पाणी या नवीन धोरणाचे कौतुक आहे. हे पाणी मिळणे म्हणजे अधिकृत असण्याचा पुरावा नाही तर ही माणुसकी आहे. हक्काचे पाणी मिळाले पाहिजे म्हणून ही योजना आहे, असे सांगत आता सभा सुरू होत आहेत. १४ तारखेला सभेत जे मनात आहे ते मी बोलणार. माझे काही तुंबलेले नाही. पण मनामध्ये आहे त्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.

टॅग्स :उद्धव ठाकरे