Join us  

“महाराष्ट्र पेटेल अशी वक्तव्य करू नका; श्रीराम जरूर म्हणा, परंतु…”; मंत्री जितेंद्र आव्हाडांची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2022 5:35 PM

महाराष्ट्र शांत आहे. कुठेही क्लेश नाही. द्वेष दिसत नाही असं मंत्री जितेंद्र आव्हाडांनी सांगितले.

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणाचे राजकीय पडसाद २ दिवसांपासून राज्यात उमटत आहेत. मशिदीवरील भोंगे काढा अशी मागणी राज ठाकरेंनी करत जर सरकारने हे केले नाही तर मशिदीबाहेर लाऊडस्पीकरला हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला. राज ठाकरेंच्या आदेशानंतर राज्यात मनसे कार्यकर्त्यांनी भोंगे लावून हनुमान चालीसा लावत आहेत. त्यावरून आता राष्ट्रवादीने राज ठाकरेंना सल्ला दिला आहे. महाराष्ट्र पेटेल असं काही वक्तव्य करू नका अशी हात जोडून विनंती असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी म्हटलं आहे.

आज राष्ट्रवादीच्या जनता दरबार उपक्रमाला आले असता माध्यम प्रतिनिधींनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारलं असता जितेंद्र आव्हाडांनी हे विधान केले. आव्हाड म्हणाले की, महाराष्ट्र शांत आहे. कुठेही क्लेश नाही. द्वेष दिसत नाही. सर्व समाज एकत्र वावरताना दिसत आहेत त्यामुळे महाराष्ट्र पेटेल असं काही वक्तव्य करू नका. ही हात जोडून विनंती करतोय असं त्यांनी सांगितले.

तसेच कोरोना संक्रमणाची दोन वर्षे संपल्यानंतर लोकांना काम लागलंय. त्यांच्या खिशात पैसे नाहीयत. गॅस महाग झालाय. पेट्रोल-डिझेल महागलंय, भाज्या, केरोसिन महाग झालंय. खाण्यापिण्याच्या वस्तूपासून सर्वच महाग झालंय याबाबत काही बोलत नाहीत. मात्र जे गरजेचं नाही ते इश्यू बनवले जात असून मुख्य विषयापासून दुसरीकडे नेण्याचे काम सुरू आहे असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. गॅसबद्दल, पेट्रोल-डिझेल, महागाई याबद्दल बोला ना. ही महागाई गरीबांना किती खाते आहे याबद्दल बोला, श्रीराम जरूर म्हणा परंतु लोकांना 'राम नाम सत्य है' बोलायला लावू नका असा स्पष्ट इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

ईडी, आयकरच्या धाडी टाकतायेत. या झोपडपट्ट्यातील मदरशावर धाडी टाका ही पंतप्रधानांना विनंती आहे. पाकिस्तानची गरजच कशाला. उद्या काय घडलं तर आतमध्येच इतकं भरून ठेवले आहे. अनेक मशिदी अशा आहेत त्यात आत काय चालू आहे कळत नाही. काय काय गोष्टी बाहेर येतील त्याने धडकी भरेल. प्रार्थनेला विरोध नाही मशिदीवरील लागलेले भोंगे खाली उतरवावेच लागतील. या सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल अन्यथा जिथे जिथे भोंगे लागतील तिथे दुप्पट लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी(Raj Thackeray) गुढीपाडवा मेळाव्यात दिला होता.  

टॅग्स :जितेंद्र आव्हाडराज ठाकरे