मनोहर कुंभेजकर
मुंबई : केंद्र सरकारच्या मत्स्यव्यवसाय खात्याने राज्य सरकारच्या मत्स्यव्यवसाय खात्याला विश्वासात न घेता पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी ६१ दिवसांवरून ४७ दिवसांचा केला आहे. मच्छिमार संघटनांची शिखर संघटना असलेल्या कोळी महासंघाने तसेच मासेमारील राज्यात अग्रेसर असलेल्या वेसावे कोळीवाड्यातील मच्छिमार नेत्यांनी या निर्णया विरोधात आक्रमक भूमिका घेतली.
कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी सांगितले की,यंदा वर्षभर मासळीच्या हंगामात वादळ, नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळाचा सामना करीत असणाऱ्या मच्छिमारांना त्याची भरपाई , सानुग्रह आर्थिक मदत मिळावी अशी मागणी कोळी महासंघ करीत असतानाच कोरोना महामारी टाळेबंदीने यात मच्छीमारांवर गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. राज्यातील ७० टक्के मासेमारी व्यवसाय या कालावधीमध्ये बंद करण्यात आला असताना केंद्र आणि राज्याने मच्छीमारांना सानुग्रह अनुदान अथवा आर्थिक मदत करण्याऐवजी मासेमारी बंदी कालावधीत शिथिलता आणून मच्छिमारांची चेष्टाच केली असा आरोप टपके यांनी केला आहे. पावसाळी मासेमारी बंदी कालावधी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर दि,१ जून ते दि, ३१ जुलै असा लागू केला असताना आता कोरोना महामारीचे निमित्त साधून या कालावधी १५ दिवसांनी कमी करण्याची चेष्टा केंद्र सरकारने करू नये असा गंभीर इशारा कोळी महासंघाने दिला आहे. मार्च पासून सुरु असलेला लोकडाऊन यामुळे मच्छिमारी पूर्ण बिकट आणि गंभीर बनली आहे ९० % मच्छिमारांनी आपले पारंपारिक व्यवसाय बंद केलेत आणि आता उर्वरित काही दिवसांसाठी मासेमारी सुरू करण्याची परिस्थिती मच्छीमारांची नाही, असे असताना पंधरा दिवसांनी मासेमारी कालावधी कमी करून कोणाचे हित नक्की साधणार आहेत ? असा सवाल महासंघाने केला आहे. वर्षभर मासे दुष्काळावर सानुग्रह आणि भरपाई मिळावी म्हणून मागणी करत असताना, या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावून मच्छिमारांची निव्वळ फसवणूक केली जात आहे. जैवविविधतेचे कोणतेही भान न ठेवता पारंपारिक मच्छिमारांना पावसाळी प्रतिकूल परिस्थितीत लोटण्याचे आणि एलईडी आणि पर्सिसन अशा अतिरेकी मासेमारी करणाऱ्यांना साथ देण्याचे कटकारस्थान असल्याचा संशय राजहंस टपके यांनी शेवटी व्यक्त केला.
...........................
वेसावकर घेणार शरद पवार यांची भेट
मत्स्य तज्ञ व पर्यावरण तज्ञांच्या अनेक वर्षाच्या अभ्यासा नंतर वेस्ट कोस्ट मध्ये मासेमारी बंदी कालावधी दि, १ जून ते दि,३१ जुलै असा निश्चित करण्यात आला आहे. माशांची पैदास वाढणे व त्यावेळी असलेल्या पाऊस व वादळी हवामानात मच्छिमारांची सुरक्षा या सर्व दृष्टीने सदर बंदीचा कालावधी योग्य आहे. मोठ्या भांडवलदार मच्छीमारांना नजरेसमोर ठेऊन मासेमारी बंदीचा कालावधी दि, १५ जून पासून सुरू केल्यास,सर्वसाधारण मच्छीमारांच्या जिवितास व मच्छिमार नौकांना तो धोकादायक ठरणार आहे.तसेच माश्याच्या प्रजजनावर देखिल त्याचा विपरित परिणाम होईल अशी माहिती मच्छिमार नेते प्रदीप टपके यांनी लोकमतला दिली. पावसाळी मासेमारी बंदी कालावधी केंद्र सरकारच्या मत्स्यव्यवसाय खात्याचे आदेश मागे घेण्यात यावा या मागणीसाठी वेसावकरांचे शिष्टमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची लवकरच भेट घेणार आहेत अशी माहिती प्रदीप टपके यांनी दिली.मच्छिमारांच्या अनेक समस्या शरद पवार यांनी यापूर्वी सोडवल्या आहेत. त्यामुळे सदर कालावधी कमी करण्याचा आदेश रद्द करा अशी मागणी केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री गिरीराज सिंग यांना करावी अशी मागणी वेसावकर शरद पवार यांना करणार त्यांनी शेवटी सांगितले.