लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ज्या घराला आम्ही घरपण दिले, ज्या खोलीत आमच्या सुखदु:खाच्या आठवणी आहेत, ज्या जागेत जनावरांचा निवास होता, जेथे लूटमार, अपहरण, हत्या अशा घटना घडत असतानाही आम्ही दिवस काढले आता त्याच घरातून आम्हाला प्रशासन बेघर करत आहे. किमान माणसुकीच्या दृष्टिकोनातून तरी या प्रश्नी लक्ष घालून आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा, बेघर करू नका, अशी विनंती येथील रहिवासी अमीर बानो मो. हसन सय्यद यांनी दुग्ध व्यवसाय विभागाला केली.
आम्ही येथील घरात किमान १५ वर्षांपासून राहत असून, सर्व कागदपत्रे आहेत. मात्र तरीही १५ वर्षांनंतर आता आम्हाला बेघर करण्यात येत आहे, असा आराेप गोरेगाव पूर्वेकडील आरे मिल्क कॉलनी, युनिट नंबर २२ येथे वास्तव्य करणाऱ्या अमीर बानो यांनी केला. प्रशासनामार्फतच येथे राहण्यास देण्यात आले होते. आता कोरोनाकाळात घरातील दोन ते तीन सदस्य आजारी आहेत. शिवाय आमच्याकडे दुसरा आसरादेखील नाही. मतदार यादीत आमचे नाव आहे. येथील रेशन दुकानातून आम्हाला रेशन मिळत आहे. परिणामी बेघर करून आमच्यावर अन्याय करू नये, अशी मागणी त्यांनी केली.
...........................