मुंबई : घरकामगार, वाहनचालक यांना गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये येण्यास कुठलीही मनाई नाही असे स्पष्ट करताना सोसायट्यांनी स्वत:चे नियम बनवू नयेत, या शब्दात सहकार विभागाने खडसावले आहे. सहकार विभागाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, शासनाने कोरोनासंदर्भात तयार केलेल्या नियमावलीत कुठेही घर कामगार व वाहनचालकांना इमारतींमध्ये येण्यास मनाई केलेली नाही. असे असताना काही गृहनिर्माण सोसायट्या स्वत:चे नियम तयार करीत आहेत. ते शासन नियमावलीच्या विरोधात आहे.मुंबईतील अनेक गृहनिर्माण सोसायट्या घर कामगारांना आपल्या इमारतीत येऊ देत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे एखाद्या फ्लॅटधारकांची घर कामगारास पुन्हा काम देण्याची इच्छा असली तरी सोसायटीच्या मनाईमुळे ते करता येत नाही. मात्र सोसायट्यांनी स्वत:चे कोणतेही नियम परस्पर तयार करू नयेत असे सहकार विभागाने परिपत्रकात बजावले आहे.
घर कामगारांबाबत स्वत:चे नियम तयार करू नका - सहकार विभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 5:03 AM