Join us

आरेमध्ये कारशेड नकोच!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 2:49 AM

शासनाने नेमलेल्या तांत्रिक कमिटीतील तज्ज्ञांनी मेट्रो ३ च्या कारशेडसाठी आरेव्यतिरिक्त कांजूरमार्गसह अन्य जागांचे पर्याय सुचविले होते.

- अम्रिता भट्टाचारजीशासनाने नेमलेल्या तांत्रिक कमिटीतील तज्ज्ञांनी मेट्रो ३ च्या कारशेडसाठी आरेव्यतिरिक्त कांजूरमार्गसह अन्य जागांचे पर्याय सुचविले होते. मुंबईमध्ये जागेची कमतरता असली, तरी डीपीआरमध्ये रचनात्मक बदल करून पर्यायी जागांवर कारशेड तयार केली जाऊ शकते. जगभरामध्ये मेट्रो कारशेडच्या जागेवर कारशेडसह हॉटेल आणि मॉलही उभारले जात आहेत. बीकेसीमध्ये एमएमआरसीची स्वत:ची जागा आहे. मात्र त्याची किंमत जास्त असल्याचे सांगण्यात येते. जरी किंमत जास्त असली तरी कारशेडवरही महसूल देणाऱ्या अनेक गोष्टी उभारू शकतो. जगभरामध्ये असे प्रयोग करण्यात आले आहेत. मात्र मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (एमएमआरसी) हे करायचे नाही.कलिनामध्ये जागा उपलब्ध आहे, मात्र ही जागा त्यांना नको आहे. कारण ही जागा मेट्रो मार्गिकेच्या लगत आहे. मेट्रो मार्गिकेच्या सुरुवातीला किंवा शेवटी जागा हवी आहे. परंतु, दिल्लीमध्ये बºयाच ठिकाणी मेट्रो मार्गिकेच्या मध्ये कारशेड उभारण्यात आली आहे. जर दिल्लीत हे होऊ शकते, तर मुंबईत का नाही? गेल्या वर्षी एमएमआरसीने कारशेडच्या जागेवर मातीचा भराव टाकला. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यामध्ये तीन वेळा पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. केवळ भराव टाकल्याने पूरस्थिती येत असेल, तर संपूर्ण कारशेड उभारल्यावर तर मुंबईत भीषण स्थिती उद्भवू शकते. कारशेडसाठी आरेतील २,६४६ झाडे तोडली जाणार आहेत. त्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढून वातावरणात फार मोठे बदल होतील. त्यामुळे किमान मुंबईकरांच्या भविष्यासाठी तरी एमएमआरसीने आपला अट्टाहास सोडायला हवा.कांजूरमार्गमध्ये दोन मेट्रो प्रकल्पांसाठी एक कारशेड तयार करण्याइतकी जागा उपलब्ध आहे. आम्ही यावर सूचना आणि हरकतीही मांडल्या आहेत. मात्र त्यांना आरेमध्येच कारशेड बनवायचे आहे. मेट्रो-३च्या डीपीआरमध्ये इतर पर्यायांचा विचार करण्याच्या सूचना केलेल्या असताना एमएमआरसी आपला हट्ट सोडावयास का तयार नाही, असा प्रश्न आता आम्हाला पडला आहे.मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रदूषण कमी होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र भुयारी मेट्रोसाठी ऊर्जा, वीज, इंधन भरपूर लागणार आहे. त्यामुळे प्रदूषण होणे अटळ आहे. २०१५ पासून वनशक्ती ही पर्यावरणवादी संघटना आणि इतर संघटनांमार्फत रिट याचिका न्यायालयामध्ये दाखल करण्यात आल्या आहेत. त्याचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. आरेमध्ये कारशेडसह मेट्रोभवन, आरटीओ, संग्रहालय अशा सर्व प्रकल्पांना आमचा कायम विरोध राहणार आहे. याविरोधात सर्वसामान्य मुंबईकरांची आम्हाला साथ मिळत आहे. त्यामुळे आमचा लढा यशस्वी होईल.(लेखिका आरे कंझर्वेशन ग्रुपच्या सदस्या आहेत.)(शब्दांकन - योगेश जंगम)

टॅग्स :मेट्रोआरे