पहिली ते चौथीच्या शाळा यंदाच्या वर्षी नकोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 02:33 AM2021-02-13T02:33:23+5:302021-02-13T02:33:40+5:30
विद्यार्थी सुरक्षिततेच्या कारणास्तव विद्यार्थी - पालकांचा संमिश्र प्रतिसाद
मुंबई : मुंबई , ठाणे , नवी मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांतील पाचवी ते बारावीचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांची शाळांतील उपस्थिती पाहूनच पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात येणार असल्याचे या आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी तर काही ठिकाणी पुन्हा वाढत असताना पालक व विद्यार्थ्यांच्या मनात अद्यापही शाळांतील उपस्थितीविषयी धास्ती आहे.
विशेषतः मुंबई महापालिका क्षेत्रातील विद्यार्थी व पालकांची मानसिकता पाहता पहिली ते चौथीच्या शाळा यंदाच्या शैक्षणिक वर्षात सुरूच करू नयेत असे पालकांना वाटत आहे.
कोरोनाचा मुंबई महापालिका क्षेत्रातील प्रादुर्भाव पाहता मुंबई स्थानिक म्हणजेच महापालिका प्रशासन व आयुक्तांनी अद्याप शाळाचे कोणतेच वर्ग सुरु करण्यास परवानगी दिलेली नाही. पहिली ते चौथीचे विद्यार्थी तर अधिक संवेदनशील असून त्यांच्या सुरक्षेची अधिकाधिक काळजी घ्यावी लागणार असल्याने या क्षेत्रातील या वर्गांच्या शाळा सुरु करण्यास परवानगी मिळणे यंदाच्या शैक्षणिक वर्षात तरी कठीणच असल्याचे मत काही अधिकारी व्यक्त करत आहेत.
एकीकडे कोरोनाच्या सुरक्षिततेच्या भीतीने पालकांनी व प्रशासनाने धास्ती घेतली असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांमधून मात्र शाळा सुरु करण्याविषयी संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची
शाळा व्यवस्थापननिहाय संख्या
व्यवस्थापन मुले मुली एकूण
सरकारी अनुदानित ५५३७२ ५६६१४ १११९८६
विनाअनुदानित ७१८७७ ६४२८४ १३६१६१
स्वयंअर्थसाहाय्यित ८६७०१ ६९६४३ १५६३४४
महापालिका ७३५३० ७३५५० १४७०८०
एकूण २८७४३० २६४०९१ ५५१५७१
ऑनलाईन शिक्षणामुळे शाळेत जाता येत नाही, मित्रांना , मैत्रिणींना भेटता येत नाही मात्र सध्याच्या काळात आपल्या आणि आपल्या घरातल्यांच्या सुरक्षिततेसाठी हेच योग्य आहे. अजून काही दिवस आपण सगळ्यांनी सोशल डिस्टसिन्गचे नियम पाळायला हवेत आणि मास्क घालायला हवा.
- आयुष पुराणिक, इयत्ता चौथी
शिक्षक ऑनलाईन शिकवतात पण मज्जा येत नाही. गणितासारखे विषय ऑनलाईन समजायला कठीण जातात. शिक्षक फळ्यावर सांगायचे तेव्हा ते सोपे वाटायचे. शिवाय आम्हाला आता मिटायराना भेट येत नाही, खेळता येत नाही, स्पोर्ट्स आणि इतर ऍक्टिव्हिटीज ही बंद आहेत. शाल लवकर सुरु करायला हव्यात
- शार्दुल मोरे, इयत्ता तिसरी
शाळेमध्ये शिकवतात तेच सध्या शिक्षक ऑनलाईन घेत आहेत पण कधी कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम झाला कि लेक्चर पूर्ण होत नाही. मग फक्त शिक्षक अभ्यास देतात. शाळा कधी सुरु होणार अजून तरी माहित नाही पण लवकर सुरु व्हायला हव्यात
- तेजश्री रेळेकर, इयत्ता तिसरी
आमचा अभ्यास सुरु आहे आणि अजून तरी कोरोना कमी जास्त आहे, त्यामुळे यावर्षी तरी शाळा नको
- राधा सबनीस, इयत्ता चौथी
मुलांचा ऑनलाईन अभ्यास सुरु आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी भीती अजून टळलेली नाही , त्यामुळे प्रशासनाने पहिली ते चौथीच्या शाळा तरी यंदा सुरु करू नयेत , त्यांना ऑनलाईन होणाऱ्या अभ्यासावर पुढच्या वर्गात उत्तीर्ण करायला हवे
- मोरेश्वर जगदाळे, पालक
शाळा सुरु झाल्यावर पहिली ते चौथीच्या मुलांवर वेळोवेळी लक्ष ठेवता येणार आहे का? शाळेसाठी पालकांची संमती आवश्यक असल्याने पालक शाळांमध्ये आपल्या मुलांना पाठविणार का हाच प्रश्न आहे . पहिली ते चौथीच्या शाळा यंदाचं वर्षी नकोत. - सरिता फाळके, पालक
पहिली ते चौथीची मुले लहान आहेत. सध्यस्थितीत त्यांना प्रादुर्भाव झालाच किंवा अशा वातावरणात ते आजारी पडले तर कोण काय करणार ? त्यामुळे यंदाच्या वर्षी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पर्यायच चांगला आहे.
- रमेश कवाडे, पालक
मुले घरात बसून , घरात अभ्यास करून कंटाळली आहेत ही वस्तुस्थिती आहे, मात्र म्हणून त्यांना सध्या शाळांमध्ये पाठविणे हा योग्य पर्याय नाही. शिक्षण ऑनलाईन असले तरी पालकांनी ते वापरत असलेल्या ऑनलाईन गॅजेट्सवर मर्यदाही हवी - मनीषा शिंदे, पालक