मुंबई : आम्हाला शौचालय नको तर त्या जागी वाचनालय हवे, अशी मागणी राहुलनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व समाज जागृती संघाच्या वतीने करण्यात आली. वाचनालय तोडून शौचालयाचे काम सुरू केल्याच्या निषेधार्थ रहिवाशांनी चेंबूरच्या एम पश्चिम कार्यालयावर मोर्चा काढला होता.चेंबूरच्या टिळकनगर परिसरातील शांता जोग मार्गावरील राहुलनगर, पंचशीलनगर, श्रमजीवीनगर येथील रहिवाशांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने नागरिकांनी व कामगारांनी एकत्र येत १९९५ साली या ठिकाणी स्वखर्चाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अभ्यासिका व वाचनालय सुरू केले. या वाचनालयात आत्तापर्यंत २५०० पुस्तके जमा आहेत. आठवड्याभरापूर्वी हे वाचनालय तोडण्यात आले व त्या जागी शौचालय बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे संतप्त नागरिक व कामगारांनी याविरोधात एम पश्चिम कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चामुळे येथील शौचालयाचे बांधकाम थांबविण्यात आले. परंतु दोन दिवसांपासून पुन्हा हे बांधकाम सुरू करण्यात आले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी गुरुवारी मोठ्या संख्येने मोर्चा काढत एम पश्चिम कार्यालयाबाहेर दोन तास ठिय्या दिला. यामुळे चेंबूरच्या मार्ग क्रमांक १वर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. या वेळी नागरिकांनी स्थानिक भाजप नगरसेवक सुषम सावंत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.>...अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार!स्थानिक रहिवासी विजय दळवी यांनी सांगितले की, वाचनालय ज्या परिसरात आहे त्या परिसरात शौचालयदेखील आहे. यामुळे नव्याने शौचालय बांधायची गरज नाही. परंतु स्थानिक नगरसेवकाला ती जागा बळकवायची असल्याने तेथे मनमानी कारभार सुरू आहे. येत्या १४ एप्रिलच्या आत पालिकेने त्या जागेवर वाचनालय उभे केले नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.
शौचालय नको, वाचनालय हवे, पालिकेवर मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 11:50 PM