लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर काहीअंशी हॉटेल, रेस्टॉरंट उघडू लागली आहेत. त्यामुळे खवय्यांची गर्दी येथे सुरू झाली आहे. त्यात पावसाळाही सुरू झाला आहे. त्यामुळे खवय्यांनी पोट आणि कोरोना संसर्गापासून सावध राहणे गरजेचे आहे. यासाठी हॉटेल उघडली तरी जिभेचे लाड नको, पोट सांभाळणे अतिशय आवश्यक आहे.
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून हॉटेल रेस्टॉरंटमध्ये बसून जेवण, नाश्ता बंद होते. केवळ पार्सल सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. जस-जसा संसर्ग कमी होईल तसा निर्बंध कमी केले जात आहेत. येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट उघडणार आहेत. मात्र, लोकांनी कोरोना संसर्गाची जाणीव ठेवून सर्वत्र संचार करणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात हे खायला हवे
- भाजलेला मका खा. त्यामुळे व्हिटॅमिन्स मिळतात.
- आल्याचा अथवा तुळस घातलेला चहा प्यावा. त्यात चवीकरिता मध, लिंबूही टाकता येतो.
- ताज्या भाज्या खाव्यात. विशेषत: मोड आलेले कडधान्ये खावीत.
- ब्रोकोली, गाजर, मशरूम, टोमॅटो उकडून खाले तर ते शरीरास खूप फायदेशीर ठरते.
- इम्युनिटी वाढविण्यासाठी प्रमाणात ड्रायफ्रूट्स, फळे खावीत.
- मोरावळा खावा. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, ओटस यांपासून बनविलेले पदार्थ.
- दुधात सूंठ, हळद घालून प्यावी.
- रस्त्यावरचे अन्न नकोच
रस्त्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे
पावसाळ्यात आरोग्याची काळजी खूप महत्त्वाची आहे. पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती कमी होते. बॅक्टेरिया, विषाणूचे वाढलेले प्रमाण पावसाळ्यात अधिक असते. पदार्थ बनविण्यासाठी अनेकदा शुद्ध पाणी नसते, गाळलेले किंवा उकळलेले पाणी नसते, त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. उघड्यावर ठेवलेल्या अन्नावर माशा बसून ते अन्न दूषित करतात. त्यामुळे पोटाचे विकार उद्भवत असल्याने रस्त्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे.
आहारतज्ज्ञ काय म्हणतात?
पावसाळा आणि कोरोना काळात बाहेरील अन्नपदार्थांऐवजी घरातील खाद्यपदार्थ खावेत. बाहेरचे अन्न खाल्ल्याने पोटाचे विकार होतात. टायफॉईड, जुलाब, उलटी, हेपेटायसिस होतो. त्यामुळे पाणी उकळून प्यावे आणि बाहेरचे खाणे टाळावे
- डॉ. संजय डोळस, प्रमुख वैद्यकीय अधिकारी, माँ रुग्णालय
पावसाळ्यात कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ टाळावेत हा प्रश्न असतो. यामध्ये भेळ फरसाण हे खाऊ नये. डाळिंब आणि पपई वगळून इतर फळेही खाऊ नयेत. मैद्याचे पदार्थ टाळावेत ब्रेड, बिस्कीट, खारी खाऊ नये. घरचे भरपूर शिजवलेले, उकडलेले अन्न खावे, भूक असेल त्या प्रमाणात अन्न खावे. जेवणात ज्वारीचा समावेश असावा.
- डॉ. नितीन थोरात, आयुर्वेद विशेतज्ज्ञ