घाबरू नका! रेशन कार्ड रद्द नाही तर श्वेत होणार; या योजनेतून वगळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 04:57 AM2021-02-06T04:57:31+5:302021-02-06T04:58:59+5:30
Ration card News : शिधापत्रिकाधारकांचे उत्पन्न १ लाखाहून अधिक असल्यास त्यांचे रेशनकार्ड रद्द होणार, अशा बातम्या व्हायरल हाेत आहेत. मात्र, यात काहीही तथ्य नाही.
- गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई - शिधापत्रिकाधारकांचे उत्पन्न १ लाखाहून अधिक असल्यास त्यांचे रेशनकार्ड रद्द होणार, अशा बातम्या व्हायरल हाेत आहेत. मात्र, यात काहीही तथ्य नाही. तर केसरी किंवा लाभार्थी रेशनकार्ड असणारे व यापैकी ज्यांचे उत्पन्न एक लाखाच्यावर आहे त्यांचे कार्ड श्वेत होणार आहे. याचाच अर्थ कार्डामार्फत मिळणाऱ्या अन्नसुरक्षा योजनेमध्ये त्यांना समाविष्ट केले जाणार नसल्याने त्यांचे धान्य बंद होईल, अशी माहिती रेशनिंग व नागरी पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, अपात्र शिधापत्रिकाधारकांची शोधमोहीम दिनांक १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे.
कार्ड तपासणी प्रक्रिया सुरू असून, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येणाऱ्या समितीवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. ज्यात शोध मोहिमेंतर्गत शिधापत्रिका तपासणीची कार्यपद्धती ठरवणे, शिधापत्रिका तपासणीचा आढावा घेणे, खासगी किंवा सरकारी कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीकडे जर लाभार्थी किंवा केसरी शिधापत्रिका असेल मात्र त्यांचे उत्पन्न १ लाखाच्यावर असेल तर त्याचे केशरी शिधापत्रक रद्द करून त्याजागी श्वेत शिधापत्रिका देणे, विदेशी नागरिकांना शिधापत्रिका दिली जाणार नाही, याची दक्षता घेणे, अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या समितीवर सोपविण्यात आल्या आहेत.
एकूण रेशन कार्डधारक
(मुंबई व ठाणे - ग्रामीण वगळता)
पिवळे (बीपीएल ) : २३,७९३
अंत्योदय : २०,६१४
केशरी : ३२,५३,२१४
हे पुरावे आवश्यक; पण
भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, एलपीजी जोडणी क्रमांक, बँक पासबुक, विजेचे देयक, टेलिफोन/ध्वनी देयक, वाहनचालक परवाना (कार्यालयीन/इतर), मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, आदी पुरावे आवश्यक आहेत. मात्र, हे पुरावे एक वर्षाहून जुने नसावे.
...तर शिधापत्रिका रद्द होईल
कार्डधारकांना आवश्यक ते पुरावे सादर करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला जाईल. मात्र, तरीही संबंधित व्यक्ती ते आणण्यास असमर्थ ठरली तर त्याची शिधापत्रिका रद्द करण्यात येईल. उदाहरणार्थ निवासस्थानाच्या पुराव्याबाबत छाननी करताना काही संशयास्पद आढळल्यास, शिधापत्रिकांच्या पुराव्याबाबत संशय आल्यास त्याची तपासणी पोलिसांकडून करण्यात येईल.