कोणताही दुष्परिणाम नाही; वैद्यकीय तज्ज्ञांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतलेल्या लाभार्थ्यांना दुसरा डोस घेण्यासाठी उशीर झाल्यास घाबरुन जाण्याची गरज नसल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. तसेच, काहीसा उशीर झाल्यास कोणताही दुष्परिणाम नसल्याचेही सांगितले. त्यामुळे कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी ठराविक वेळेहून अधिक कालावधी लागल्यास पहिला डोस उपयुक्त ठरत नसल्याची बाबही चुकीची असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. सध्या राज्यात पाच लाखांहून अधिक लाभार्थी कोवॅक्सिन लसीच्या दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षेत आहेत.
लसीच्या पहिल्या डोसनंतर प्रतिपिंड निर्माण झालेले असतात, त्यात दुसरा डोस घेण्यास उशीर झाला तर त्याचे प्रमाण कमी होत नाही, किंवा अन्य कोणतेही दुष्परिणाम हाेत नाहीत. दुसरा डोस हा लसीचा बूस्टर डोस मानला जातो, त्यामुळे दुसऱ्या डोस नंतर प्रतिपिंडाची क्षमता अधिक वाढते आणि सुरक्षिततेचे कवच मजबूत होते. पहिल्या डोसनंतरही निर्माण झालेल्या प्रतिपिंडाचा कालावधी हा ४ ते ५ महिन्यांचा असतो. त्यामुळे सद्यस्थितीत लसीकरण केंद्रांवरील गर्दी पाहता किमान ज्येष्ठ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी घाई करू नये, ही केंद्रे संसर्गाचे माध्यम बनू शकतात. संवेदनशील गटातील नागरिकांनी लस घेण्यापूर्वी ही काळजी घ्यावी, असे इम्युनोलॉजिस्ट डॉ. विनिता बाल यांनी सांगितले.
* पुन्हा दाेन्ही लस घेण्याची आवश्यकता नाही!
राष्ट्रीय पातळीवरील ॲडव्हर्स इव्हेंट्स फाॅलोविंग इम्युनायझेशनचे सदस्य डॉ. एन. के. अरोरा यांनी सांगितले की, दुसऱ्या डोसमधील अंतर वाढल्यास घाबरुन जाण्याची गरज नाही. सध्या पहिल्या डोसनंतर ८ ते १० आठवड्यांचे अंतर हवे अशी नियमावली आहे, मात्र दुसऱ्या डोसला उशीर झाल्यास पुन्हा दाेन्ही लस घेण्याची आवश्यकता नाही.
---------------------------------