‘त्या’ ठेकेदाराला पैसे देऊ नका; मुंबई-गोवा हायवेवरील खड्डे पाहून मंत्री संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 10:39 AM2023-07-15T10:39:30+5:302023-07-15T10:39:50+5:30
या परिसरात कोणता ठेकेदार काम करीत आहे, कोणत्या अधिकाऱ्यांकडे याची जबाबदारी आहे, असे प्रश्न विचारून त्यांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाची शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पाहणी केली. पाहणीवेळी नागोठणे नजीकच्या पांडापूर येथे त्यांना रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले दिसले. खड्ड्यांमुळे महामार्गाची झालेली चाळण पाहून चव्हाण यांचा संताप अनावर झाला. पांडापूर परिसरात रस्त्याचे काम ज्या ठेकेदाराकडे आहे, त्याला माझ्या परवानगीशिवाय देयक अदा करू नये, असे सांगून बांधकाम विभागाच्या संबंधित अभियंत्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांनी कारवाईचे आदेश दिले.
या परिसरात कोणता ठेकेदार काम करीत आहे, कोणत्या अधिकाऱ्यांकडे याची जबाबदारी आहे, असे प्रश्न विचारून त्यांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. चव्हाण यांचा पनवेल ते झाराप असा एक दिवसाचा हा दौरा होता. आ. प्रशांत ठाकूर, महामार्ग अधिकारी, ठेकेदार यांसह पत्रकार या पाहणीत सहभागी झाले होते. या महामार्गाचे चौपदरीकरण २०१० साली सुरू झाले. बारा वर्षे होऊनही महामार्गाचे काम रखडलेलेच आहे. आजही प्रवाशांना खड्डेमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागतो. शासनाने हा महामार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे ठरविले आहे. महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी नवे ठेकेदार नेमले आहेत.
कशेडी बोगदाही होणार सुरू
कशेडी बोगद्याबाबतही महामार्गाप्रमाणे तांत्रिक अडचणी आहेत. मात्र, तोही सुरू होईल. महामार्गाच्या कामासाठी अद्ययावत अशी दोन यंत्रे आणली असून, त्याद्वारे अर्धा किलोमीटर रस्ता दिवसभरात पूर्ण होत आहे. राज्यात किंवा इतर राज्यांत अशी यंत्रे असतील तर त्या आणण्याच्या सूचना ठेकेदारांना दिल्या आहेत. यासाठी शासनाचे पूर्ण सहकार्य राहील, असेही चव्हाण यांनी सांगितले.
गणपतीपूर्वी एक मार्गिका पूर्ण
मुंबई - गोवा महामार्गाची एक मार्गिका गणपतीपूर्वी पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील तर दुसरी मार्गिका ही डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. तांत्रिक अडचणीवर मात करून शासन, अधिकारी, ठेकेदार यांच्यात समन्वय घडवून आणू आणि महामार्ग पूर्ण करू, असेही त्यांनी सांगितले.