मुंबई : दहावी बारावीच्या राज्य मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा अखेर पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र परीक्षा पुढे ढकलत राहणे हा या परिस्थितीवरचा उपाय नसून केवळ तात्पुरती पर्यायी व्यवस्था आहे. त्यामुळे पुढे काय परिस्थिती असेल? कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असेल? त्या परिस्थितीत विदयार्थ्यांच्या सुरक्षिततेचे काय या साऱ्याचा सारासार विचार करून दहावी बारावी ऑफलानइन परीक्षांना इतर योग्य उपाय सुचवावा अशी मागणी आता पालक संघटना आणि शिक्षक संघटनांकडून शिक्षण विभाग व राज्य सरकारला करण्यात येत आहे. परीक्षा आणि त्यातून मिळणाऱ्या गुणांपेक्षा विदयार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य देऊन ऑनलाइन पद्धती, अंतर्गत मूल्यामापन, तोंडी परीक्षा यांच्या गुणांवर यंदाच्या वर्षी दहावी बारावीची मूल्यमापन पद्धती आधारित असावी, अशी मागणी जोर धरत आहे. सद्यस्थितीत केवळ १२ ते १५ दिवसावर बारावीची परीक्षा असताना आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपण लॉकडाऊन उंबरठ्यावर असताना ऑफलाइन परीक्षा राज्य सरकारकडून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थी पालक, शिक्षक साऱ्यांनाच मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र अद्याप परीक्षांचा तिढा सुटलेला नसल्याने पालक चिंतेत आहे.
Exam : परीक्षा पुढे ढकलणे नको, अंतर्गत मूल्यमापन करा!, ऑनलाइन पर्याय राबविण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 1:05 AM