‘दो बंडल मशीन मे मत डालो अंकल, नोट फस जाएंगे!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:06 AM2021-07-15T04:06:28+5:302021-07-15T04:06:28+5:30
बोलण्यात गुंतवीत वृद्धाला ९९ हजारांचा गंडा : कुरार पोलिसांकडून दोघांना अटक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एटीएममध्ये पैसे भरताना ...
बोलण्यात गुंतवीत वृद्धाला ९९ हजारांचा गंडा : कुरार पोलिसांकडून दोघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एटीएममध्ये पैसे भरताना ‘दो बंडल मशीन मे मत डालो अंकल, नोट फस जाएंगे’, असे सांगत मदतीचा आव आणून वृद्धाला ९९ हजारांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी कुरार पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने बुधवारी दोघांना पकडून एक कार आणि रोख रक्कम हस्तगत केली आहे. रमेश देवणगाव (३२) आणि फिरोज पठाण (३५), अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्यावर घाटकोपर पोलिसांतही गुन्हे दाखल असल्याचे समजते.
देवणगाव हा व्यवसायाने चालक, तर पठाण हा चिकन विक्री करणारा दुकानदार आहे. तक्रारदार किशोरीलाल बिस्सा (६०) हे एका पतंजली प्रोडक्टच्या दुकानाचे मालक गौरव कनोडिया यांच्याकडे कलेक्शन आणि बँकेच्या व्यवहारांचे काम पाहतात. ते ७ जुलै २०२१ रोजी गोरेगावच्या दिंडोशी येथील बँक ऑफ इंडिया येथे एटीएम मशीनमध्ये कनोडिया यांनी दिलेले ९९ हजार रुपये एटीएममार्फत खात्यात भरण्यासाठी गेले होते. पैसे भरताना त्यांनी कंपनीचा खाते क्रमांक टाकला आणि मशीनचे डिपॉझिट डोअर उघडले. त्याच क्षणी एक इसम तिथे आला आणि पैशाचे दोन बंडल एकाचवेळी आत टाकू नका. अन्यथा नोट अडकेल असे त्यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी दोन टप्प्यांमध्ये पैसे भरले. त्यावेळी ५०० ची एक नोट परत आली. ती नोट त्यांनी घेताच मशीनचे शटर बंद झाले. मात्र, त्याची पावती त्यांना मिळाली नाही. तेव्हा तुमचे पैसे खात्यात जमा झाले. कधीकधी मशीनमध्ये प्रिंटिंग पेपर नसला की असे होते असे अनोळखी व्यक्तीने त्यांना सांगितले. पैसे जमा झाल्याची खात्री बँकेत जाऊन करून घ्या, असेही सुचविले. त्यानुसार बिस्सा यांनी बँक मॅनेजरला पैसे भरल्याची पावती मिळाली नसल्याचे सांगितले. मात्र, खात्यात पैसे जमा होतील तुम्ही काळजी करू नका, असे मॅनेजरने सांगितल्याने बिस्सा हे ऑफिसला निघून गेले. संध्याकाळी गौरव यांनी ऑनलाइन बँक खाते तपासले तेव्हा त्यात पैसे जमा झाले नव्हते. बिस्सा यांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आणि त्यांनी कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
एटीएममध्ये पैसे भरल्यावर कन्फर्म आणि रिकन्फर्म असे विचारले जाते. पैसे भरल्यानंतर बिस्सा यांनी कन्फर्म बटण दाबले, पण रिकन्फर्म केले नाही. रक्कम भरल्यानंतर शटर बंद झाले तेव्हा बिस्सा यांना आरोपींनी पैसे जमा झाल्याचे सांगत बँकेत पाठविले आणि नंतर कॅन्सल बटन दाबले, ज्यामुळे ९९ हजार रुपये बाहेर आले आणि ते घेऊन आरोपी पळाले.
कारच्या नंबर प्लेटमुळे सापडला आरोपी
कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चाळके, सहायक पोलीस निरीक्षक नाईक आणि पथकाने घटनास्थळीचे सीसीटीव्ही फुटेज पडताळले. तेव्हा तिघे जण एका कारमध्ये बसत असल्याचे त्यांना दिसले. त्या कारच्या नंबरप्लेटवरून त्याच्या मालकाला संपर्क करण्यात आला. तेव्हा ती देवळगाव याला दोन वर्षांपूर्वी विकल्याचे समजले. त्यानुसार त्याला नवी मुंबईतून ताब्यात घेत अन्य साथीदारांनाही पकडण्यात आले.
(फोटो ओळ : वृद्धाला फसविणारा सूचना : देवणगाव आणि त्याचा साथीदार पठाण.)