जुन्या इमारतीत जीव धोक्यात घालू नका! नोटीस बजावणार, पालिका पाणी कापणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 02:41 PM2023-05-18T14:41:25+5:302023-05-18T14:41:40+5:30

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त चहल यांनी नुकतीच विविध विभागांची बैठक घेतली.

Don't risk your life in an old building A notice will be issued, the municipality will cut off the water | जुन्या इमारतीत जीव धोक्यात घालू नका! नोटीस बजावणार, पालिका पाणी कापणार

जुन्या इमारतीत जीव धोक्यात घालू नका! नोटीस बजावणार, पालिका पाणी कापणार

googlenewsNext

मुंबई : मुंबईत अनेक जीर्ण इमारती असून, या इमारती कोसळण्याचा धोका पावसाळ्यात अधिक आहे. इमारत कोसळून कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी पालिका या इमारतींमधील रहिवाशांना नोटीस बजावणार आहे. इतकेच नव्हे तर या इमारतींचा पाणी पुरवठा खंडित करण्याच्या सूचनाही पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त चहल यांनी नुकतीच विविध विभागांची बैठक घेतली. या बैठकीत ‘सी १’ श्रेणीतील धोकादायक इमारती रिकाम्या करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना इमारत रिकामी करण्याच्या नोटीस बजावण्याच्या तसेच रहिवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यासही त्यांनी प्रशासनाला सांगितले. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये धोकादायक इमारतींचा पाणी पुरवठा खंडित करण्यास त्यांनी प्रशासनाला सांगितले.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जुन्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. डोंगरा‌ळ भागातील दरडींखाली राहणाऱ्या कुटुंबांच्या सुरक्षेचाही प्रश्न येतो. त्यामुळे जुन्या इमारतीत जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या रहिवाशांच्या सुरक्षेसाठी पालिकेने ठोस पावले उचलावीत, त्यांची पर्यायी व्यस्था करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. 

निवाऱ्यासाठी विभागात ५ शाळांची व्यवस्था 
आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून प्रत्येक विभागात ५ शाळांमध्ये अतिवृष्टीसारख्याप्रसंगी नागरिकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. या ठिकाणी अन्न आणि तात्पुरत्या निवाऱ्याची सुविधा पालिका प्रशासनाकडून देण्यात येणार आहे.

हवामानाचे  अपडेट्स एसएमएसने मिळणार 
आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून यंदा पावसाळ्याच्या कालावधीसाठी नियंत्रण कक्ष तसेच हवामानाचे वेळोवेळी अलर्ट देणारी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. विभागीय पातळीवर आपत्कालीन परिस्थितीत निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना पावसाळ्याच्या कालावधीत वेळोवेळी अपडेट्स देणाऱ्या मेसेजची यंत्रणा यंदा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एका एसएमएस ॲपच्या सहाय्याने हे एसएमएस अलर्ट नागरिकांना पाठविण्यात येतील.
 

Web Title: Don't risk your life in an old building A notice will be issued, the municipality will cut off the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.