नोकरीच्या मागे धावू नका, उद्योजक व्हा; राज्यपाल रमेश बैस यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 01:19 PM2023-07-21T13:19:01+5:302023-07-21T13:19:39+5:30
राज्यपाल रमेश बैस यांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशभरात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. केंद्र आणि राज्य शासनाने शैक्षणिक धोरणात बदल केले असून संशोधन, कौशल्य विकसित आणि उद्योजक तयार होणारे धोरण तयार केले आहे. युवकांनी खासगी किंवा सरकारीनोकरीच्या मागे न धावता उद्योजक बनावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
डॉ. होमीभाभा राज्य विद्यापीठाच्या दुसऱ्या दीक्षांत समारंभात राज्यपाल बैस बोलत होते. माजी खासदार, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. राजनीश कामत, कुलसचिव डॉ. युवराज मलघे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक विजया येवले आदी उपस्थित होते. याप्रसंगी राज्यपालांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पीएच.डी. आणि इतर पदवी प्रदान करण्यात आली.
मन आणि ताकदीच्या जोरावर ज्ञानाची पातळी वाढविण्याचे आवाहन सहस्रबुद्धे यांनी केले.
संशोधनामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यापीठाला चार पेटंट मिळाले असून, येणाऱ्या काळात टी-२० मिनी लीग सामने भरविण्याचे उद्दिष्ट असल्याचे डॉ. कामत यांनी या वेळी सांगितले.
विद्यापीठानेही उणिवा शोधाव्या : राज्यपाल
नवीन शैक्षणिक धोरणानंतर विद्यार्थ्यांना आवडत्या क्षेत्रातील प्रशिक्षण, कौशल्य प्राप्त करून घेता येणार आहे. त्यामुळे टीम लीडर बनण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांनी आव्हाने स्वीकारावीत, बदल स्वीकारावेत. गुणात्मक अभ्यास केल्यास यश नक्की मिळते. विद्यापीठाने उणिवा शोधून विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा.