आमचे मैदान पळवू नका! ‘नायर’च्या विद्यार्थ्यांची मागणी, जागा घेण्याचा पालिकेचा घाट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 09:54 AM2023-05-11T09:54:56+5:302023-05-11T09:55:21+5:30
शहरात अगोदरच खेळाचे मैदान कमी असताना नायर रुग्णालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची हाजीअली येथील मैदानाची जागा घेण्याचा घाट महापालिकेने घातला आहे.
संतोष आंधळे
मुंबई : शहरात अगोदरच खेळाचे मैदान कमी असताना नायर रुग्णालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची हाजीअली येथील मैदानाची जागा घेण्याचा घाट महापालिकेने घातला आहे. हाजीअली येथे नायरच्या विद्यार्थ्यांचे हॉस्टेल असून, त्याला लागूनच मोठे मैदान आहे. त्या मैदानावर विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक व विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. मात्र, त्या मैदानातील काही भागांत आता महापालिकेतील अधिकाऱ्यांसाठी क्लब हाउस बांधण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, मैदानाची जागा कुणाला देऊ नका, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली असून, याला सर्वच स्तरातून विरोध होत आहे.
नायर रुग्णालयाच्या या हॉस्टेलमध्ये सध्या चारशे विद्यार्थी राहत आहेत, तसेच त्याला लागूनच नवीन ६६ खोल्यांची नवीन हॉस्टेलची इमारत तयार झाली आहे. त्याठिकाणी १०० ते १५० निवासी डॉक्टर राहू शकतात इतकी क्षमता त्या होस्टेलची आहे. वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे बहुतांश विद्यार्थी राज्यातील विविध भागांतून आपले घर सोडून हॉस्टेलला राहून आपले शिक्षण पूर्ण करत असतात. त्यात वैद्यकीय विषयाचा अभ्यास म्हणजे त्यांच्यावर आणखी या अभ्यासाचा अतिरिक्त ताण असतो. या अशा परिस्थितीत त्यांना तणावरहित राहण्याकरिता या मैदानावरील खेळ हा पर्याय असतो. या मैदानावर विद्यार्थी विविध खेळ खेळत असतात.
काही महिन्यांपूर्वी या मैदानाच्या काही भागावर क्लब हाऊस बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केल्याचे कळते. मात्र, ज्यावेळी ही माहिती विद्यार्थ्यांना कळली त्यानंतर मात्र त्यांनी तत्काळ या गोष्टीला विरोध करीत यासंदर्भातील निवेदन रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना दिले आहे. कारण, या मैदानावर फक्त खेळच नाही तर महापुरुषांची जयंती, गणेशोत्सव असे विविध कार्यक्रम येथे घेतले जातात. मुलांच्या खेळाच्या या हक्काच्या ठिकाणावर महापालिकेने कोणत्याही पद्धतीने ताबा घेऊ नये अशी मागणी विद्यार्थी स्तरातून होत आहे, तसेच विद्यार्थ्यांच्या मागणीला महाविद्यालयातील काही प्राध्यापकांनी पाठिंबा दर्शविला आहे.
हीच जागा का?
हाजीअलीतील विद्यार्थ्यांचे मैदान म्हणजे दक्षिण मुंबईतील मोक्याचे ठिकाण आहे. बऱ्यापैकी महापालिकेचे अधिकारी या भागात राहतात. जर या जागेवर हे क्लब हाउससाठी गेले, तर आणखी एका मैदानाचा बळी जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.