Join us

शहिदांचा त्याग, समर्पण वाया जाऊ देऊ नका - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 1:08 AM

कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून नौदलाने विद्यार्थ्यांसाठी व सर्वसामान्य नागरिकांसाठी युद्धनौकेला भेट देण्याची परवानगी दिली होती.

मुंबई : कारगिल विजय दिवस हा आपल्यासाठी अभिमानाचा आणि आपल्या वीर जवानांच्या शौर्याला सलाम करण्याचा क्षण आहे. शहिदांनी देशाच्या भविष्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, ही भावना सदैव जागृत ठेवावी लागेल. त्यामुळे शहिदांचा त्याग आणि समर्पण वाया जाऊ देता कामा नये, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कुलाबा येथील शहीद स्मारकाला भेट देऊन सकाळी मुख्यमंत्र्यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना आदरांजली वाहिली. या वेळी नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग आॅफिसर कमांडिंग इन चिफ व्हाइस अ‍ॅडमिरल पी. अजित कुमार, लेफ्टनंट जनरल एस.के. प्राशर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भारतीय लष्कर, वायूसेना आणि नौसेनेच्या वतीने कुलाबा लष्करी तळाच्या प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तिन्ही दलांच्या सशस्त्र तुकड्यांनी शहीद स्मारकास मानवंदना दिली.

दरम्यान, मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे शहिदांच्या पाल्यांना अध्यक्ष संजय भाटिया यांच्या हस्ते लॅपटॉपचे वितरण करण्यात आले.

...अन् विद्यार्थ्यांनी पाहिली युद्धनौकाकारगिल विजय दिनाचे औचित्य साधून नौदलाने विद्यार्थ्यांसाठी व सर्वसामान्य नागरिकांसाठी युद्धनौकेला भेट देण्याची परवानगी दिली होती. ८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या युद्धनौकेला भेट दिली. कारगिल युद्ध, युद्धामध्ये युद्धनौकेचे असलेले महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना नौदलाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी माहिती दिली.

सैन्यदल आणि कलाकारांच्या संघामध्ये फुटबॉल सामनाकारगिल विजय दिवसानिमित्त सैन्यदलाचा संघ विरुद्ध मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचा संघ यांच्यामध्ये फुटबॉल सामना खेळविण्यात आला. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे आणि माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत हा सामना झाला. या संघामध्ये अभिनेते अभिषेक बच्चन, अर्जुन कपूर आदींचा समावेश होता. सैन्य दलाने ३-१ ने सामना जिंकला. मध्यंतरात शीख रेजिमेंटने गटका मार्शल आर्टचे सादरीकरण केले.

हवाई दलाचे प्रदर्शन : कारगिल शहीद दिनानिमित्त कुपरेज मैदान येथे नौदल, सैन्यदल आणि हवाईदलाचे प्रदर्शन लावण्यात आले होते. यामध्ये विविध युद्ध सामग्रीचा समावेश होता. या प्रदर्शनाचे तसेच कार्यक्रमाचे तावडे व निलंगेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

टॅग्स :देवेंद्र फडणवीस