घरे विकू नका, मुंबईवरील हक्क गमावू नका; मुख्यमंत्र्यांची साद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 06:18 AM2020-03-02T06:18:15+5:302020-03-02T06:18:18+5:30
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात गिरणी कामगारांचे असलेले योगदान महाराष्ट्र शासन कधीही विसरणार नाही.
मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात गिरणी कामगारांचे असलेले योगदान महाराष्ट्र शासन कधीही विसरणार नाही. संपामुळे या गिरणी कामगारांवर बेघर होऊन मुंबईबाहेर जाण्याची वेळ आली. ‘आज तुमच्यासाठी काही केले नाही, तर इतिहासात आमची नतद्रष्ट म्हणून नोंद होईल. म्हणूनच हे सगळे करायचे आहे. ही घरे तुमच्यासाठी देतो आहे. तुमच्यामुळे आज आम्ही आहोत. कित्येक लोकांनी बलिदान दिले आहे. रक्त सांडून मिळवलेली मुंबई आपली आहे. तिला विकून जाऊ नका,’ असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
म्हाडाचा विभागीय घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे चौथ्या टप्प्यांतर्गत गिरणी कामगार व त्यांच्या वारसांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि कामगार नेते दत्ता इस्वलकर यांच्या हस्ते संगणकीय सोडत रविवारी वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात काढण्यात आली. त्या वेळी उद्धव ठाकरे बोलत होते. गिरणी कामगारांसाठी येत्या १ एप्रिल २०२० रोजी रांजणोली (तालुका भिवंडी, जि. ठाणे) येथील एमएमआरडीएने बांधलेल्या सदनिकांची सोडत काढण्यात येणार आहे. आज काढलेल्या सोडतीतील सदनिकांची विक्री किंमत साडेनऊ लाख रुपये निश्चित करण्यात आल्याचे ठाकरे यांनी सांगितले. चौथ्या टप्प्यांतर्गत गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठी मुंबईच्या मध्यवर्ती भागातील बॉम्बे डाइंग स्प्रिंग मिल, बॉम्बे डाइंग टेक्सटाईल मिल आणि श्रीनिवास मिलच्या जागेवर उभारण्यात आलेल्या ३ हजार ८९४ सदनिकांसाठीची ही सोडत होती.
मी आज भाषण न करता कुटुंबातील प्रमुख म्हणून तुमच्याशी संवाद साधणार आहे, अशी सुरुवात करून मुख्यमंत्र्यांनी गिरणी
कामगारांचे ऋण माझ्यावर आहे आणि ते व्यक्त करण्यासाठी आलो आहे, असे सांगितले. घर लागल्यावर मला आपल्या घरी चहा प्यायला बोलवा, घरे विकू नका, मुंबईवरील हक्क गमावू नका, असेही ठाकरे या वेळी म्हणाले.