मुंबई - शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी भाजपा हा पक्ष जन्माला येण्याआधी मुंबईत आमचा नगरसेवक होता, आमदार होते, असा दावा केला आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांवर फडणवीसांनी केलेल्या टिकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलंय. त्यावरुन, आता भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. संजय राऊत यांच्यावर भाजपचे इतर नेतेही जबरी टीका करताना दिसत आहेत. त्यातच, शिवसेना-भाजपा युतीवरुनच्या वादात आता पूनम महाजन यांनीही संजय राऊतांना चांगलंच सुनावलंय.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी हिंदुत्वासाठी मर्दांसारखी युती केली होती. त्यामुळे, नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका, अशा शब्दात पूनम महाजन यांनी संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्यंगचित्रावरुन त्यांच्यावर पलटवार केला आहे. संजय राऊत यांनी युतीसंदर्भात एक ट्विट केले होते, त्यामध्ये आर. के. लक्ष्मण यांनी रेखाटलले व्यंगचित्रही शेअर करण्यात आले. त्यामुळे पूनम महाजन यांनी आपला संताप व्यक्त केला होता.
खुशामतगीर म्हणून अव्वल राहाल
राम सातपुते यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. "जनाब संजय राऊत, तुमचं इतिहासातलं नाव खुशामतगीर म्हणून नेहमीच अव्वल राहिलं, कारण आपल्या सारखा 'खुशामतगिर' परत होणे नाही. कदाचित त्यामुळे आपल्याला 'प्राईड व्ह्युल्यू' काय असते? हे समजण्याची तुमची कुवत नाही. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी बांधत असलेलं सेंट्रल व्हिस्टा हे नव संसद भवन असो, की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा असो की काशीचं भव्य दिव्य मंदीर असो. हे सर्व तुमचा जळफळाट करणारच आहे" असं सातपुते यांनी म्हटलं आहे. "असो, महाराष्ट्रातील समस्यांबद्दलही लिहत चला, असेही सातपुते यांनी म्हटलंय.