मुंबई मनपा म्हणतेय, आज रात्री ११ नंतर पार्टी संपवू नका; पण...
By मोरेश्वर येरम | Published: December 31, 2020 02:55 PM2020-12-31T14:55:21+5:302020-12-31T15:06:28+5:30
मुंबईत 'थर्टी फर्स्ट' सेलिब्रेशन करणाऱ्या तरुणाईचा हिरमोड झाला होता. पण मनपाने आज मध्यरात्रीसाठी नववर्षांच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर एक सवलत दिली आहे.
मुंबई
राज्यात महानगरपालिका क्षेत्रात सरकारने रात्री ११ नंतर संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे मुंबईत 'थर्टी फर्स्ट' सेलिब्रेशन करणाऱ्या तरुणाईचा हिरमोड झाला होता. पण मनपाने आज मध्यरात्रीसाठी नववर्षांच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर एक सवलत दिली आहे.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रेस्टॉरंट्सला रात्री ११ नंतरही घरपोच सेवा करण्याची अर्थात पार्सल सुविधेची परवानगी दिली आहे. त्यामुळे रात्रीचे ११ वाजले आणि शहरात संचारबंदी लागू झाली असली तरी तुम्हाल घरबसल्या रेस्टॉरंटमधून खाद्यपदार्थ मागवता येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या ट्विटर हँडलवर यासंबंधिचं एक ट्विट करण्यात आलं आहे. "मुंबई, रात्री ११ नंतर पार्टी संपवू नका, नूतन वर्षाचे स्वागत घरीच करा", असं आवाहन करताना आज उपहारगृहांना (रेस्टॉरंट) रात्री ११ नंतर घरपोच सेवा करण्याची अनुमती देण्यात आली आहे, अशी घोषणा मनपाने ट्विटमध्ये केली आहे. यासोबतच "मुंबईस सुरक्षितरित्या नवीन वर्षात पदार्पण करण्याकरिता कोरोनाविषयीच्या सर्व सुनिश्चित नियमांचे काटेकोरपणे पालन करा", असं आवाहनही मुंबई मनपाने केलं आहे.
Don’t Stop The Party, Mumbai - Just Take It Indoors After 11:00!
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) December 31, 2020
Restaurants are allowed to home deliver food in the city post 11:00pm.
COVID-prevention norms will have to be followed to ensure Mumbai rings in the new year with safety.#MyBMCUpdates#NaToCorona#StayHome
रात्री ११ नंतर संचारबंदी कायम
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि नव्या स्ट्रेनचा धोका लक्षात घेता. राज्य सरकारने महानगरपालिका क्षेत्रांमध्ये रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी शहरांमध्ये रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे संचारबंदी आजही कायम असणार आहे.
हॉटेल व्यावसायिक नाराज
ख्रिसमस आणि नववर्ष स्वागतावेळी हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठी संधी असते. याआधीच लॉकडाउनमुळे हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे ख्रिसमस आणि नववर्ष स्वागतावेळी मध्यरात्री १.३० वाजेपर्यंत हॉटेल सुरू राहू द्यावेत, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली होती. पण राज्य सरकारकडून हॉटेल व्यावसायिकांची मागणी फेटाळून लावण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे.