मनोहर कुंभेजकर, मुंबई : केवळ राजकारण करण्यासाठी खोटी माहिती पसरवून धारावी पुनर्विकास प्रक्रिया रोखण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा धारावीतील जनता आणि भावी पिढ्या तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत", असा इशारा शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी विरोधकांना दिला. धारावीत सुरू झालेल्या सर्वेक्षणाच्या विरोधात खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल विरोधकांकडून केली जात आहे. यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
वास्तविक दि, 18 मार्च रोजी धारावीतील कमला रमण नगर येथून धारावी पुनर्विकासासाठी प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरूवात झाली. या सर्वेक्षणात धारावीतील प्रत्येक बांधकामाची नोंद बारकोडच्या माध्यमातून करण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी या सर्वेक्षणाला धारवीकरांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाने विरोधकांचे अवसान गळाले आहे. त्यामुळे त्यांनी विनाकारण बिनबुडाचे आरोप करत जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरविण्यास सुरुवात केली. कमला रमण नगर हा परिसर धारावी नोटिफाईड एरियाचाच भाग असून यापूर्वी देखील येथे एसआरएने सर्वेक्षण केले होते. त्यामुळे विरोधकांच्या आरोपात काहीही तथ्य नसून पुनर्विकास प्रकल्पाला खोडा घालण्याचा हा प्रयत्न त्यांनी थांबवावा असे खासदार शेवाळे यांनी स्पष्ट केले. तसेच, धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विशेष प्रकल्पाचा दर्जा दिला असल्याने येथील प्रत्येकाला घर मिळणार असून पात्र आणि अपात्र बांधकामांबाबत राज्य सरकारच्या वतीने निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे जनतेने खोट्या प्रचाराला बळी न पडता या सर्वेक्षणाला सहकार्य करावे, असेही शेवाळे म्हणाले.