लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आपल्याला इच्छितस्थळी लवकर पोहोचता यावे म्हणून प्रवासी बस आणि रेल्वेपेक्षा रिक्षा आणि टॅक्सीचा आधार घेतात; परंतु याचा गैरफायदा रिक्षा आणि टॅक्सीचालक घेत असून, अवाच्या सव्वा भाड्याची मागणी करतात. पाऊस किंवा बसचा संप असेल तर प्रवाशांची जास्तच लूट केली जाते. त्यामुळे मुंबईतील आरटीओ कार्यालयांनी व्हाॅट्सॲप नंबर आणि ई-मेल आयडी देऊन तक्रार करण्याचे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, अंधेरी आणि बोरिवली आरटीओ कार्यालयात १०४ तक्रारी आल्या आहेत. याप्रकरणी चालकांना नोटीस बजाविण्यात आली आहे.
रिक्षा-टॅक्सीचालकांवर कारवाई करण्यासाठी अंधेरी आणि बोरिवली आरटीओने व्हाॅट्सॲप क्रमांकाद्वारे तक्रार करण्याचे आवाहन प्रवाशांना केले होते. १५ दिवसांत अंधेरी आरटीओमध्ये ७८ तक्रारी आल्या. तर बोरिवली आरटीओशी संबंधित २९ रिक्षा-टॅक्सीचालकांविरोधात तक्रारी आल्या. यामध्ये सर्वाधिक तक्रारी भाडे नाकारणे आणि जादा भाडे घेण्याच्या होत्या.
या गाड्यांचे नंबर वाहन ४.० प्रणालीवर ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहेत. या चालकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी एका आठवड्याचा कालावधी देण्यात आला असून, दोषी आढळणाऱ्या चालकाचा परवाना निलंबित केला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
रिक्षा आणि टॅक्सीचालकांनी भाडे नाकारू नये, जादा भाडे आकारू नये. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल; तसेच प्रवाशांनी व्हॉट्सॲप आणि ई-मेलवर आपल्या तक्रारी नोंदवाव्यात. - अशोक पवार, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी, अंधेरी