Join us

'माझं ते विधान गांभीर्याने घेण्यासारखं नाय', शहाजी बापू पाटलांची एक दिवसांत पलटी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 8:38 AM

गुरसाळे येथे पार पडेलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजन प्रसंगी ते बोलत होते

मुंबई/सोलापूर - काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील या एका डायलॉगमुळे प्रचंड लोकप्रियता मिळालेले बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) राज्यभरातील राजकारणात चांगलेच सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी दौऱ्यावर असताना ते भाषणाची संधी सोडत नाहीत. नुकतेच एका कार्यक्रमात शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, राजकीय वर्तुळात चर्चा रंगताच आमदार पाटील यांनी आपले विधान सहजतेनं घ्या, म्हणत घुमजाव केल्याचे दिसून आले. 

गुरसाळे येथे पार पडेलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजन प्रसंगी ते बोलत होते. विधानपरिषदेची मागणी केल्यामुळे आमदार शहाजीबापू पाटील यांनी विधानसभा निवडणूक रणांगणातून काढता पाय घेतला की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याने अवघ्या एका दिवसांतच आमदार शहाजीबापूंना आपल्या विधानावर स्पष्टीकरण द्यावे लागले. 'तो विषय असा सहज घेण्यासारखा आहे, तो गांभीर्याने घेण्यासारखा नाही. अभिजीत पाटील हे नात्याने माझे भाचे आहेत, एवढ्या तरुण वयात ४ ते ५ साखर कारखाने चालवतात. त्यामुळे, एवढा कर्तृत्त्ववान तरुण महाराष्ट्राच्या राजकारणात मी पहिला बघतो. त्याला उत्साह येण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी मी केलेलं ते व्यक्तीगत विधान आहे.', असे ते म्हणाले.  

नेमकं काय म्हणाले शहाजीबापू पाटील?

सांगोला विधानसभा मतदारसंघातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना आमदार करा आणि मला तुमच्यासारखे विधान परिषदेवर पाठवा. अभिजीत पाटील यांच्यासाठी पंढरपूरमधून परिचारक, मंगळवेढ्यातून अवताडे तर माढ्यामधून बबनदादा म्हणतेय माझा पोरगं भाजपमध्ये पाठवतो. आपले झाडी डोंगर अस झालंय की आपल्या काय नांदेडमध्ये गेले की गर्दी, कोकणात गेले तरी गर्दी. त्यामुळे मला तुमच्यासारखे विधानपरिषदेवर घ्या आणि अभिजितला सांगोल्यात उमेदवारी द्या, अशी जाहीर मागणी शहाजीबापू पाटील यांनी प्रवीण दरेकर यांच्याकडे केली. या कार्यक्रमाला प्रवीण दरेकर उपस्थित होते.  

टॅग्स :आमदारसांगोलासोलापूर