Join us

जनतेच्या पैशाचा प्रतिमा संवर्धनासाठी वापर करू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 5:48 AM

काँग्रेसचा टीका; एमटीडीसीने काश्मीरमध्ये खर्च का करायचा?

मुंबई : महाराष्ट्रातील एमटीडीसी रिसॉर्टची अवस्था अत्यंत दयनीय असून राज्यामध्ये पर्यटन वाढीकरिता अधिक गुंतवणुकीची गरज असताना काश्मीरमध्ये एमटीडीसीचे रिसॉर्ट बांधण्याचा निर्णय हा महाराष्ट्राचे हित डावलून महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा मोदी सरकारच्या प्रतिमा संवर्धनाकरिता आणि काश्मीरबाबतचा मोदी सरकारचा निर्णय योग्य ठरविण्याकरिता खर्च केला जात आहे. अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

सावंत म्हणाले, याआधीही महाराष्ट्राचे पाणी गुजरातला वळवण्याचा विषय असेल किंवा मुंबईत होणारे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये हलवण्याचा निर्णय याच भाजप सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाची सरकारी कार्यालये व उद्योग प्रकल्प गुजरातला नेण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. केवळ गुजरातच्या फायद्यासाठी होणारी बुलेट ट्रेन राज्याच्या तिजोरीवर भार टाकून केली जात आहे. महाराष्ट्राच्या भाजप शिवसेना सरकारने मोदींच्या इशाऱ्यावरती महाराष्ट्राची कुचंबणा केली आहे. महाराष्ट्रावर प्रचंड कर्ज असताना, बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले असताना महाराष्ट्रातच अधिक गुंतवणुकीची गरज आहे. इतर क्षेत्राबरोबरच पर्यटन क्षेत्रातही महाराष्ट्र मागे पडला आहे. कोकण असेल वा अन्य विभागात पर्यटन क्षेत्रासाठी अधिक गुंतवणुकीची आवश्यकता असताना महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा काश्मीरमध्ये खर्च करण्याची आवश्यकता काय? असा संतप्त सवाल सावंत यांनी केला.

टॅग्स :काँग्रेससचिन सावंतजम्मू-काश्मीर