Join us

"५ कोटींचा बोभाटा नको"; बच्चू कडूंनी सांगितलं किती मराठ्यांचं ओबीसी आरक्षण राहिलंय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 9:38 AM

शिंदे समिती रद्द झाली नाही, तर छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा, असा प्रहार आमदार बच्चू कडू यांनी केला आहे.

मुंबई - राज्यात आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी यांच्यातील संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील सातत्याने करत आहेत. तर, शिंदे समिती बरखास्त करा आणि मराठा समाजाला कुणबी म्हणून दिलेले प्रमाणपत्र रद्द करा, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी  केली आहे. त्यामुळे, मराठा आणि ओबीसी संघर्ष पुढे येत असून छगन भुजबळांच्या सभेला मराठा समाज आणि मराठा नेते विरोध करत आहेत. आमदार बच्चू कडू यांनीही छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर मत व्यक्त करत किती मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, याचे गणितच मांडले आहे.   शिंदे समिती रद्द झाली नाही, तर छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा, असा प्रहार आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. ओबीसीमध्ये मराठा घुसतोय, असे काहीही नाही. कारण कोकणातला, विदर्भातला मराठा कुणबी झाला. पण, चार-पाच जिल्ह्यातलाच मराठा कुणबी होत नाही. त्यासाठीच गाजावाजा होतोय. हे सगळे राजकीय श्रेय घेण्याचे काम आहे. ज्यांचे काहीच राहिले नाही, त्यांचे जातीच्या नावाने चांगभले आहे. ते आता नळावरच्या भांडणासारखे भांडायला लागले. याचे मला नवल वाटते, असे स्पष्ट मत बच्चू कडू यांनी मांडले.

मराठ्यांना वेगळं काढून ओबीसींच भलं होणार नाही, ओबीसींची भलं करण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत. एकूण ९ जिल्हे आहेत, तेथील कुटुबांची संख्या ४ लाख एवढी आहे. आपण ८ जिल्हे पकडले तर ८ जिल्ह्यातील एकूण संख्या ३२ लाख एवढी होईल. त्या ३२ लाखातील अर्धे बाद झाले, मग राहिले अर्धे १६ लाख. १६ लाखचे ४ गुणा केल्यास ६४ लाख होतात. आता, ३६ लाख लोकांना प्रमाणपत्र भेटलंय. राहिला विषय ३६ लाखांचा, त्याला तुम्ही विरोध करताय. पण, इकडे मराठा कायदेशीर मार्गाने कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे, ते कोणीही रोखू शकत नाही, असे म्हणत आमदार कडू यांनी मराठा समाजात कुणीबीचा लाभ मिळणाऱ्यांची आकडेवारीच सांगितली. 

आता, १० ते १५ लाख मराठे राहिले आहेत. मात्र, यांनी बोभाटा केला की ५ कोटी मराठे ओबीसीत सामिल होणार. विदर्भातला बच्चू कडू ५० वर्षांपासून सामिल झालाय. विदर्भातील झाला, खान्देशातील झाला, पश्चिम महाराष्ट्रातला झाला, कोकणातलाही ५० वर्षे अगोदर झालाय. त्यामुळे, मराठ्यांना आता कुणबी प्रमाणपत्र मिळणारच आहे, असेही कडू यांनी स्पष्ट केले.  

जरांगे-भुजबळ आमने-सामने

मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आमनेसामने आले आहेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. मराठा कुणबी व कुणबी मराठा जात प्रमाणपत्रे देण्यासाठी नेमलेली शिंदे समिती व मागील दोन महिन्यांत दिलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द करा. ज्या सवलती सारथीच्या माध्यमातून मिळतात, त्या ओबीसींनाही द्या, अशी मागणी छगन भुजबळ यांनी हिंगोली येथील ओबीसी एल्गार महामेळाव्यात केली. यावरून आता दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

टॅग्स :मराठा आरक्षणअन्य मागासवर्गीय जातीओबीसी आरक्षणमराठाबच्चू कडू