मुंबई : ठाण्यातील काही तरूण सोमवारी मजूरांच्या छावण्यांमध्ये अन्न वाटपासाठी गेले होते. एका मजूराने विनंती केल्यामुळे त्याच्या मोबाईलचे सिमकार्ड एका तरुणाने आॅनलाईन रिचार्ज करून दिले. ही बातमी छावणीत पसरल्यानंतर अनेकांनी फूड पॅकेट सोडून या तरुणालाच गराडा घातला. मोबाईल बंद पडल्याने गावी संपर्क तुटला आहे. अन्न खूप जण देतात. तुम्ही मोबाईल रिचार्ज करून दिला तर उपकार होतील अशी विनवणी हे मजूर करत होते.
कोरोनाच्या संकट कोसळल्यानंतर भितीपोटी अनेक परप्रांतीय मजूर आपल्या गावांकडे निघाले होते. त्यांना सरकारने वेगवेगळ््या छावण्यांमध्ये रोखून ठेवले आहे. तिथे त्यांना अन्न दिले जाते. आरोग्य तपासणी होते. सुरक्षेसाठी मास्कही मिळतात. मात्र, सोमवारी घडलेल्या या प्रकारानंतर मजुरांना मोबाईल रिचार्जची चिंता असल्याचे निदर्शनास आले. बहुतांश मजूर प्री पेड पध्दतीने १४ किंवा २१ दिवसांचे रिचार्ज करत असतात. २१ मार्चला लॉकडाऊन झाल्यापासून रिचार्ज करणा-या दुकानांचे शटर डाऊन आहे. मजूरांकडे क्रेडिट - डेबीट कार्ड किंवा गुगल पे सारखे पर्याय नाही. आॅनलाईन रिचार्ज करता येत नसल्याने अनेकांचे फोन बंद झाले आहेत. या संकटकाळात परराज्यात असेलेल्या कुटुंबाशी संपर्क तुटल्यामुळे ते अस्वस्थ झालेले दिसतात. केवळ मजूरच नाही अनेक गरिबांच्या वस्त्यांमध्ये मोबाईल रिचार्जची ही समस्या भेडसावत असल्याची माहिती हाती आली आहे.------
१० टक्के मोबाईल बंद ?महाराष्ट्रातील लोकसंख्या १२ कोटींच्या आसपास असली तरी इथे मोबाईल जोडण्यांची संख्या १३ कोटी ४० लाख असल्याची माहिती नुकत्याच प्रसिध्द झालेल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून पुढे आली होती. मोबाईल वापरणा-यांपैकी जवळपास ८५ टक्के हे प्रीपेड ग्राहक आहेत. त्यापैकी ४० टक्के ग्राहक आॅनलाईन पध्दतीने भरणा करतात. तर, एकूण ग्राहकांपैकी महिन्यापेक्षा कमी कालावधीचे रिचार्ज करणा-यांचे प्रमाणत २५ टक्क्यांच्या आसपास आहे. त्यापैकी काही जणांनी आपल्या परिचित व्यक्तींच्या सहाय्याने आॅनलाईन रिचार्ज केले असले तरी किमान १० ते १२ टक्के फोन रिचार्ज आभावी बंद पडले असतील अशी शक्यता ठाण्यातील एका मोबाईल विक्रेत्याने व्यक्त केली आहे.