Join us

रेल्वेचा आवाज नको रे बाबा, गोरेगावकरांनी ठेवले कानावर हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 4:07 AM

उपनगरीय रेल्वे मार्गाच्या दुतर्फा राहणाऱ्यांनी रेल्वेच्या आवाजाचाच त्रास होतो, अशी तक्रार केली तर...केली तर नव्हे, गोरेगावकरांनी अशी तक्रार केलीच ...

उपनगरीय रेल्वे मार्गाच्या दुतर्फा राहणाऱ्यांनी रेल्वेच्या आवाजाचाच त्रास होतो, अशी तक्रार केली तर...केली तर नव्हे, गोरेगावकरांनी अशी तक्रार केलीच आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर सतत उपनगरीय आणि बाहेरगावच्या रेल्वेगाड्यांची वर्दळ असते. उपनगरीय व मेल-एक्सप्रेसच्या गाड्यांचे मोठाले भोंगे आणि गाड्यांचा आवाज याचा काहीतरी बंदोबस्त करावा, अशी मागणी पश्चिम रेल्वे व्यवस्थापनाकडे गोरेगावकरांनी केली आहे.

रेल्वेचा हा आवाज म्हणजे ध्वनी प्रदूषण आहे. त्यामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब या व्याधींनी रहिवाशांना ग्रासले आहे. तत्काळ प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून मोटरमननी स. ९ ते रात्री ८ या वेळेत भोंगे वाजवू नयेत, अशी मागणी गोरेगाव प्रवासी संघाने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे,

पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त महाव्यस्थापक तसेच

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे.

रेल्वेमुळे होणाऱ्या आवाजामुळे खूप त्रास होत असल्याच्या तक्रारी गोरेगाव पूर्वेतील पांडुरंगवाडीच्या रहिवाशांकडून गोरेगाव प्रवासी संघाकडे आल्या असल्याचे संघाचे अध्यक्ष उदय चितळे यांनी सांगितले. रेल्वेच्या हॉर्नच्या कर्कश आवाजासह ध्वनी प्रदूषणाची इतर कारणे म्हणजे कालबाह्य झालेले रेल्वेचे डबे व व्हील बेअरिंग, रेल्वे ट्रॅकची देखभाल वेळेवर न करणे आणि ट्रॅकमध्ये एकसमान जागा न ठेवणे. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी संघाने केली आहे. गोरेगाव विभागात रेल्वे कंपाऊंडच्या भिंतींच्या बाजूने बरेच अतिक्रमण झाले आहे. रेल्वे कंपाऊंडच्या भिंतींवर उडी मारून नागरिक पांडुरंगवाडीत प्रवेश करतात. तसेच ते कचरा रेल्वे ट्रॅकवर टाकतात. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणीही प्रवासी संघाने केली आहे.