कालचे ओझे नको, उद्याची चिंता नको; बिर्लांच्या यशाचं रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 06:35 AM2023-04-28T06:35:15+5:302023-04-28T06:36:20+5:30
उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांच्या व्यावसायिक यशाचे रहस्य आणि व्यक्तिगत आठवणींचा श्रीमंत खजिना
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : येती किमान काही दशके सातत्याने ६ ते ८ टक्के या गतीने वार्षिक विकासदर वाढीची खात्री देणारी अर्थव्यवस्था लाभलेला भारत हा वर्तमान जगाच्या अर्थचित्रातील एक प्रमुख दावेदार आहे. माझी पिढी, माझ्या मुलांची पिढी आणि नंतरच्याही पिढ्यांच्या वाट्याला हा अत्यंत ऊर्जस्वल कालखंड आला आहे; कारण मी, माझी कंपनी, माझे कुटुंब, मी राहतो तो समाज आणि माझा देश या सगळ्यांच्याच भाग्यरेखा नियतीने एकत्रितरीत्या कोरलेल्या आहेत. त्यामुळे भूतकाळ उकरणे किंवा भविष्याच्या विचाराने चिंतित असण्यापेक्षा आपण सर्वांनीच वर्तमानाची ऊर्जा शोषून घेतली पाहिजे, असे अत्यंत आश्वासक प्रतिपादन आदित्य बिर्ला समूहाचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांनी केले आहे.
‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ या सोहळ्यात ‘दूरदर्शी उद्योगपती’ या विशेष पुरस्काराचा स्वीकार केल्यानंतर लोकमत समूहाचे संयुक्त कार्यकारी आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते.
‘व्यवसाय आणि भावना यांच्यातले नाते अतीव टोकापर्यंत ताणू न देता योग्य वेळी त्यांचा घटस्फोट झालेलाच बरा,’ असा एक मोलाचा सल्लाही बिर्ला यांनी दिला. आपले वडील आदित्य बिर्ला यांना अत्यंत प्रिय असलेली कोलकात्यानजीकची एक सूतगिरणी बदलत्या व्यावसायिकसंदर्भात तोट्यात गेली आणि तिथला आर्थिक संघर्ष टोकाला पोहोचला, तेव्हा काळजावर दगड ठेवून ती विकावी लागली, हा आपल्या आयुष्यातील सर्वांत कठीण व्यावसायिक निर्णय होता, असेही ते म्हणाले.
‘गेल्या १० वर्षांत आदित्य बिर्ला समूहाचा वार्षिक महसूल २० अब्ज डॉलर्सवरून ६० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढला, कर्मचाऱ्यांची संख्या एक लाख ८० हजारांच्या घरात गेली, याच काळात या उद्योगसमूहाने किमान २२ महत्त्वाचे उद्योग अधिगृहित केले; हे सारे करण्याची ऊर्जा तुमच्यात येते कुठून?’ अशी उत्सुक विचारणा ऋषी दर्डा यांनी केली, तेव्हा स्वभावगत विनम्रता आणि वंशपरंपरागत अदबीने कुमार मंगलम बिर्ला यांनी या यशाचे सारे श्रेय आपल्या सहकाऱ्यांना दिले. ते म्हणाले, माझे सहकारी आज ३६ देशांत पसरलेले आहेत, त्यांचे समर्पण आणि कष्ट नसते, तर मी एकटा असे काय करू शकणार होतो? आदित्य बिर्ला समूहाच्या व्यावसायिक यशाचे संपूर्ण श्रेय वेगवेगळ्या स्तरांवर आपापले कर्तव्य उत्स्फूर्त जबाबदारीने निभावणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचेच आहे!’
‘आदित्य बिर्ला समूह हा प्रामुख्याने उत्पादनाशी जोडलेल्या पारंपरिक उद्योगांच्या भक्कम पायावर उभा आहे; पण आधुनिक भारताची ओळख असलेल्या तंत्रज्ञानाधारित उद्योगांकडे तुम्ही कसे पाहता?’ या प्रश्नावर कुमार मंगलम यांनी त्यांच्या समूहाची बदलती धोरणे आणि लक्ष्य स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘उत्पादन क्षेत्रात आम्ही आहोत तिथे तर आमचा विस्तार होईलच; पण सेवा आणि तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या नवउद्योगांमधून भविष्यकाळात आदित्य बिर्ला समूहाचा किमान २० टक्के महसूल येईल. या महसुलापेक्षाही महत्त्वाची असेल ती या उद्योगांमुळे येणारी ऊर्जा आणि ‘व्हॅल्यू क्रिएशन !’ थेट ग्राहकांशी मुखर असलेल्या उद्योगांमध्ये (कझ्युमर फेसिंग इंडस्ट्रीज) प्रवेश हा सध्याचा जागतिक कल आहे आणि आदित्य बिर्ला समूहही त्या दिशेने वाटचाल करतो आहे.’
‘इट्स ऑलवेज गुड टू बी इन प्रेझेंट!’
वयाची तिशी, चाळिशी आणि पन्नाशी यांतील कुठला टप्पा तुम्हाला व्यक्तिगतरीत्या अधिक महत्त्वाचा वाटतो, या प्रश्नावर सस्मित नजरेने
ऋषी दर्डा यांच्याकडे पाहत कुमार मंगलम बिर्ला उत्तरले, ‘इट्स ऑलवेज गुड टू बी इन प्रेझेंट!’ आणि प्रेक्षकांनी खच्चून भरलेले अवघे सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेले.
व्होडाफोन आणि आयडिया विलीनीकरणानंतर या कंपनीच्या संचालक मंडळात पुन्हा सहभागी होण्याच्या ताज्या निर्णयाबाबत बोलताना ते म्हणाले, ‘आम्हाला या क्षेत्रात नव्यानं आशा दिसते आहे. अन्य स्पर्धक कंपन्या जोमाने स्पर्धेत असल्या तरी सरकारच्या सहभागाचा फायदा या कंपनीला भविष्यात हात देईल.'