निश्चिंत राहा, सरकार स्थिर आहे, शिवसेनेच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी दिला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 06:59 AM2020-07-10T06:59:16+5:302020-07-10T07:00:03+5:30
ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक घेतली. कोरोनाच्या संकटकाळात स्वत:ची काळजी घ्या. आता कोरोनासोबत जगायचे आहे. मंत्रालयामध्ये आपली उपस्थिती वाढली पाहिजे. शिवसेनेच्या मंत्र्यांची कामगिरी इतर मंत्र्यांच्या तुलनेत कुठेही कमी पडता कामा नये असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबई : सरकारच्या स्थिरतेबद्दल माध्यमांमधून काय बातम्या येतात याकडे लक्ष देऊ नका.सरकार शंभर टक्के स्थिर आहे. तुम्ही जोमाने कामाला लागा, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना गुरुवारी दिला.
ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक घेतली. कोरोनाच्या संकटकाळात स्वत:ची काळजी घ्या. आता कोरोनासोबत जगायचे आहे. मंत्रालयामध्ये आपली उपस्थिती वाढली पाहिजे. आपल्या खात्याच्या कारभाराला पूर्वीसारखीच गती द्यायची आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांची कामगिरी इतर मंत्र्यांच्या तुलनेत कुठेही कमी पडता कामा नये असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सूत्रांनी सांगितले की शिवसेना-राष्ट्रवादीतील कुरबुरीसंदर्भात यावेळी चर्चा झाली. मला तीन पक्षांचे सरकार चालवायचे आहे. त्यामुळे काही मुद्दे उपस्थित होणारच पण आत्मसन्मान बाजूला ठेवून मी काहीही करणार नाही. आपल्या ध्येयधोरणाविरुद्ध तडजोडी स्वीकारण्याचा प्रश्नच नाही, या शब्दात मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना आश्वस्त केले.
शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्याकडे काम घेऊन आल्यानंतर त्यांना आपुलकीची वागणूक अपेक्षित आहे.यासंदर्भात कोणाची तक्रार येणार नाही हे बघा असेही मुख्यमंत्र्यांनी बजावल्याचे सूत्रांनी सांगितले