मुंबईः गेल्या महिन्याभरापासून अनेक जिल्ह्यांत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे डोळे अक्षरशः पाणावले आहेत. उत्तर महाराष्ट्र आणि कोकणाला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. हाततोंडाशी आलेली पिकं या पावसानं वाया गेली आहेत. ओल्या दुष्काळावर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. नुकसानीचा पंचनामा झाला नसेल तरी काळजी करू नका, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. पंचनामा पोहोचला नसेल तरी काळजी करू नका, शेतकऱ्यांनो तुम्हालाही वेळीच मदत मिळेल. जास्तीत जास्त पंचनामे होतील यासाठी प्रयत्न करा, विम्यासाठी सरकारी पंचनामे ग्राह्य धरण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
अवकाळी पावसाने राज्यातील शेतकर्यांचे झालेले नुकसान आणि राज्य सरकारच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या उपाययोजना याचा सविस्तर आढावा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका बैठकीतून घेतला. राज्याचे मुख्य सचिव, कृषी, मदत-पुनर्वसन, वित्त आणि विविध विभागांचे सचिव, भारतीय हवामान विभाग आणि विमा कंपन्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या मदतीने उपस्थित होते. सुमारे 325 तालुक्यांमध्ये 54,22,000 हेक्टरवर पिकं बाधित झाली आहेत. ज्वारी, मका, धान, तूर, कापूस, सोयाबीन आणि फळपिकं यामुळे बाधित झाली आहेत. प्रभावित भागाचे तत्काळ ड्रोन सर्वेक्षण करण्याचे आदेशसुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.यावर्षी अतिशय प्रचंड पाऊस झाला. एका सुपरसायक्लॉनसह 4 वादळं अरबी समुद्रात तयार झाली. या पावसाची तीव्रता ऑक्टोबरच्या दुसर्या आणि तिसर्या आठवड्यात अधिक होती. पुरावा म्हणून स्थानिक गावकर्यांनी नुकसानीचे काढलेले छायाचित्र सुद्धा ग्राह्य धरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाने ही स्थिती संपूर्ण संवेदनशीलतेने आणि सर्वोच्च प्राधान्य देत हाताळावी, प्रत्येक शेतकर्याची समस्या ऐकून घेतली जाईल, यासाठी दुष्काळाच्या काळात उभारली, तशी यंत्रणा उभारावी, व्हॉटसअॅप क्रमांक सुद्धा संपर्कासाठी उपलब्ध करून देण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. राज्य सरकार संपूर्णपणे स्थितीवर लक्ष ठेवून असून, पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन स्थितीचे अवलोकन करावे, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. उद्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सुद्धा बोलाविण्यात आल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
पुढच्या आठवड्यापर्यंत मदतकार्याला दिशा आणि गती येईल. केंद्राकडे मदत मागितली जाईल. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही आदेश देण्यात आलेले आहेत. फिल्डवरच्या लोकांशी संपर्क करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. उद्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार असून, कोकण विभागात ४६ तालुके, पुणे विभागात ५१ तालुक्यांमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई दिली जाईल. ५३ हजार हेक्टरमधील फळ-पिकांचं नुकसान झालं आहे, तर १८ ते १९ लाख हेक्टर सोयाबीनचं क्षेत्र बाधित झाल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. या पावसाचा लाखो शेतकऱ्यांना फटका बसला असून, त्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार आणि राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत नाशिकमध्ये विविध भागात पाहणी दौराही केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार विभागनिहाय जे नुकसान झाले आहे, ते पुढीलप्रमाणे : कोकण (46 तालुके/97 हजार हेक्टर), नाशिक (52 तालुके/16 लाख हेक्टर), पुणे (51 तालुके/1.36 लाख हेक्टरहून अधिक), औरंगाबाद (72 तालुके/22 लाख हेक्टर), अमरावती (56 तालुके/12 लाख हेक्टर), नागपूर (48 तालुके/40 हजार हेक्टर).