मुंबई: दादरच्या नायगाव पोलीस वसाहतीतील इमारती धोकादायक ठरवत पोलीस कुटुंबीयांना घरे खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. अशात मुलांचे शिक्षण सुरु असल्याने कुटुंबियांचा घरे खाली करण्यास नकार कायम आहे. मुलांच्या शिक्षणावर याचा परिणाम होवू नये अशी भिती कुटुंबियांना सतावत आहे. याचपार्श्वभूमीवर आज 'न्यू पोलीस कॉलनी'तील रहिवाशांनी मनसेप्रमुखराज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली.
इमारती धोकादायक जाहीर करण्यात आल्या असून राज्य सरकारने पोलीस बांधवांच्या कुटुंबियांना घरे खाली करण्याची नोटीस बजावली आहे. 'आता तुम्हीच यात हस्तक्षेप करून न्याय मिळवून द्यावा' अशी विनंती या रहिवाशांनी राज ठाकरे यांच्यासमोर केली. रहिवाशांची समस्या समजून घेत तुम्ही काळजी करू नका. तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मी व्यक्तिशः प्रयत्न करेन. संबंधित विभागाशी चर्चा करून मार्ग काढू, असं आश्वासन राज ठाकरे यांनी पोलीस बांधवांच्या कुटुंबियांना दिलं.
न्यू पोलीस कॉलनीत एकूण ५ इमारती असून त्यात २०० ते २२० कुटुंब राहण्यास आहेत. येथील इमारती धोकादायक असल्याने त्यांना ती खाली करण्याबाबत नोटीस धाडण्यात आली आहे. यावेळी पोलीस पत्नीकड़ून इमारती खाली करण्याविरुद्ध आंदोलनही छेडले. यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तसेच अनेक मान्यवर मंडळीनी रहिवाशांची भेट घेतली. दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे ही याठिकाणी येवून गेले.
न्यू पोलीस कॉलनीतील रहिवासी असलेल्या एका पोलिसाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुलांचे शिक्षण सुरु आहे. अशात नोटीसा धाडून ई आवास योजेनेद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी जेथे घर उपलब्ध अशाठिकाणी अर्ज करण्यास सांगत आहे. आधीचा कामाचा ताण त्यात या कोरोनाच्या काळात होणारी ही कारवाई चुकीची आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. इमारतीचे वेळोवेळी दुरुस्ती करण्यात येत आहे. इमारती व्यवस्थित आहेत. त्यामुळे प्रशासनाने आमच्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करून योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे. इमारती व्यवस्थित असताना महिनाभरात दोन नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. हे चुकीचे असल्याचे त्याचे म्हणणे आहे.