मुंबई - मुंबईत पुन्हा एकदा मराठी भाषेच्या आग्रहासाठी मनसेकडून आंदोलन करण्यात येत आहे. मराठीत बोलण्यावरून वाद होत असल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यात मराठीवरून मनसेच्या आंदोलनाला डिवचण्यासाठी उद्धवसेनाही पुढे आली आहे. उद्धवसेनेने हिंदी भाषिकांना साद घालत मराठी भाषा शिकवणीचे वर्ग सुरू केले आहेत. उद्धवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी कांदिवली भागात बॅनर लावत मिळून सारे शिकूया मराठी भाषा असं आवाहन केले आहे.
उद्धवसेनेच्या वतीने कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात हे बॅनर लावण्यात आलेत. त्यात घाबरू नका, चला मराठी बालूया असं म्हणत हम आपको मराठी भाषा सिखाएंगे असं म्हटलं आहे. आनंद दुबे यांनी लावलेल्या या पोस्टरमध्ये मराठी भाषेत काही मजकूर छापला आहे त्यात व्याकरणाच्या चुकाही दिसून येतात. घाबरू नका या वाक्यापुढे प्रश्नचिन्ह देण्यात आलं आहे. त्याशिवाय चला करू या, मराठी भाषेचा सन्मान ऐवजी, चला करूया मराठी भाषाचे सन्मान असं छापण्यात आले आहे.
मुंबईत मराठी-अमराठी वाद
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठी-अमराठी वाद पुन्हा उफाळून आला आहे. कांदिवलीच्या एअरटेल गॅलरीत मराठी भाषा बोलणाऱ्या तरुणासोबत कर्मचाऱ्याने घातलेला वाद व्हायरल झाला. त्यानंतर मनसेकडून आंदोलन करत एअरटेल कंपनीला इशारा देण्यात आला. त्याशिवाय एका हिंदी भाषिक सुरक्षा रक्षकाकडून मराठी गया तेल लगाने असं विधान करण्यात आले. त्यालाही मनसे कार्यकर्त्यानी चोप दिला. मराठी भाषेच्या आग्रहासाठी मनसे कार्यकर्त्यांकडून सध्या बँकांमध्ये निवेदन देण्यात येत आहे. त्यात काही ठिकाणी परप्रांतीय कर्मचाऱ्यांसोबत वादंगाचे प्रसंग उभे राहत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून मुंबईत हा बॅनर लावून मनसेला डिवचण्यात आले आहे.
मंत्री सामंतांनी घेतली राज ठाकरेंची भेट
मराठी भाषेच्या आग्रहावरून मंत्री उदय सामंत आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट झाली. या भेटीत मराठी भाषा आणि मराठी माणसांवरील अन्यायाबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कळवलं जाईल. त्याशिवाय राज ठाकरेंनी ज्या सूचना केल्यात आहे त्यादृष्टीने काही सुधारणा करण्याचे प्रयत्न करू असं मंत्री सामंत यांनी सांगितले. मराठी भाषेचा सन्मान राखला पाहिजे त्यासाठी येत्या ८-१० दिवसांत सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांची बैठक घेतली जाणार असल्याचं सामंतांनी सांगितले.