बाळासाहेबांच्या स्मारकाचे दार उघडले, युतीचे बंदच!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 05:29 AM2019-01-24T05:29:39+5:302019-01-24T05:30:04+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महापौर बंगल्यातील स्मारकासाठीची कागदपत्रे बुधवारी बाळासाहेबांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महापौर बंगल्यातील स्मारकासाठीची कागदपत्रे बुधवारी बाळासाहेबांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यानिमित्ताने युतीचा तिढा सुटण्याची अपेक्षा मात्र फोल ठरली. दोघांमध्ये बंदद्वार चर्चा झाल्याचे वृत्त लगोलग पसरले, पण अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे बहुतेक नेते हजर असताना भाजपावर सातत्याने टीका करीत असलेले खा. संजय राऊत मात्र गैरहजर होते. ते का आलेले नाहीत असे उपस्थित काही शिवसेना नेत्यांना विचारले असता त्या बाबत उद्धवजींनाच विचारा असे म्हणत त्यांनी कानावर हात ठेवला. बाळासाहेबांवरील ‘ठाकरे’ या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या कामात व्यग्र असल्यामुळे राऊत येऊ शकले नाहीत, असे सांगण्यात आले पण इतक्या महत्त्वाच्या कार्यक्रमापासून त्यांना दूर ठेवण्यात आले का ही चर्चाही या निमित्ताने राजकीय वर्तुळात रंगली.
स्मारकासाठी महापौर निवासस्थानाच्या जागेचे ताबापत्र व करारनामा मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी उद्धव यांच्याकडे सुपूर्द केला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गणेशपूजन करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, महापौर विश्वनाथ महाडेश्वर,
खासदार पूनम महाजन, चंद्रकांत खैरे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील
मंत्री, खासदार, आमदार आदी उपस्थित होते.
>युतीची चर्चा अडकली
विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की भाजपा-शिवसेनेतील चर्चा काही मुद्द्यांवर अडकली आहे. काही मागण्या एकमेकांना मान्य नसल्याने घोडे अडले आहे. सोमवारपासून पुन्हा चर्चा करण्यात येणार आहे. ही चर्चा गुप्तस्थळी सुरू आहे.