पक्षाचे नुकसान करणाऱ्यांना दार बंद, सरसकट घरवापसी नाही - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 10:15 AM2024-06-26T10:15:59+5:302024-06-26T10:16:05+5:30
पक्ष सोडताना आणि सोडल्यानंतर टीका करणाऱ्यांना दार बंद असल्याचे संकेत शरद पवारांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लोकसभा निवडणुकीत शरद पवार केलेल्या चांगल्या गटाने कामगिरीनंतर अजित गटातील आमदारांची घरवापसी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच अशी सरसकट घरवापसी होणार नाही, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. पक्षाला जिथे मदत होऊ शकेल, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढेल अशा सोडून गेलेल्या साथीदारांचे स्वागत करण्यात अडचण नाही. पण, ज्यांनी पक्षात पदे उपभोगली आणि पक्षाच्या नुकसानीसाठी पावले उचलली त्याबाबत सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय होऊ शकतो, असे पवार म्हणाले. पक्ष सोडताना आणि सोडल्यानंतर टीका करणाऱ्यांना दार बंद असल्याचेच संकेत पवारांनी दिले.
मुंबईतील पक्ष कार्यालयात मंगळवारी सूर्यकांता पाटील यांचा पक्ष प्रवेश झाला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी भूमिका स्पष्ट केली.
ओबीसी-मराठामधील दरी योग्य नाही
ओबीसी, मराठा समाजात दरी असणे हे समाजाच्या दृष्टीने, राज्याच्या दृष्टी या दृष्टीने, नव्या पिढीच्या दृष्टीने योग्य नाहीं. समाजात कटुता राहू नये याची काळजी घेतली पाहिजे. सरकारकडून याबाबत काही पावले उचलली जात असतील तर आमचे सहकार्य असेल, असेही पवार यावेळी म्हणाले.
लंकेंनी उत्तर दिले त्याचा आनंद आहे
नीलेश लंकेंनी संसदेत इंग्रजीत शपथ घेतली. त्यावर पवार म्हणाले की, एखाद्या व्यक्तीच्या भाषेबद्दल प्रश्न उपस्थित करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. त्याला लंके यांनी उत्तर दिले याचा आम्हाला आनंद आहे.
अंतापर्यंत तुमच्यासोबतः सूर्यकांता पाटील
मी घराच्या बाहेरही पडले नाही. माझा मी स्वतःला करून घेतलेला १० वर्षांचा कारावास संपवला. आता अंतापर्यंत तुमच्यासोबत राहायचे ठरवले आहे, असे वक्तव्य सूर्यकांता पाटील यांनी पक्षप्रवेशानंतर केले .