सर्वसामान्यांसाठी लोकलची दारे कधी उघडणार? मुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 07:20 PM2021-01-25T19:20:22+5:302021-01-25T19:33:59+5:30
Mumbai Local Update : कोरोना आणि लॉकडाऊनच्या नियमांमुळे गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेल्या मुंबईतील लोकलसेवेची दारे सर्वसामान्यांसाठी कधी उघडणार याची प्रतीक्षा अनेकांना लागली आहे.
मुंबई - कोरोना आणि लॉकडाऊनच्या नियमांमुळे गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेल्या मुंबईतील लोकलसेवेची दारे सर्वसामान्यांसाठी कधी उघडणार याची प्रतीक्षा अनेकांना लागली आहे. दरम्यान, मुंबईतील लोकल सेवा सुरू करण्याबाबत महत्त्वपूर्ण संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यानंतर लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर यासंदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक आज झाली. या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जराड, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर यांच्यासह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह, यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने गर्दी होणार नाही अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे सुरु करता येईल यादृष्टीने विविध पर्यायांवर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे लोकल सुरू करण्याची तारीख कधी घोषित होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.