Join us  

मुख्यमंत्री दालनाची दारे २ पर्यंत बंद; गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी अमंलबजावणी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2022 11:41 AM

मुख्यमंत्री कार्यालयात होणाऱ्या गर्दीमुळे अधिकाऱ्यांना काम करणेही शक्य होत नव्हते.

मुंबई : राज्यात सत्ताबदल झाल्यापासून मंत्रालयातील गर्दी प्रचंड वाढली आहे. मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी तर मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर पाय ठेवायला जागा नसते. या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मंत्रालयातील प्रवेश आणि मुख्यमंत्री दालनातील प्रवेशावर काही निर्बंध आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार मंत्रालयात यापुढे अभ्यागतांना दुपारी दोननंतरच प्रवेश दिला जाणार आहे. आमदारांबरोबर केवळ त्यांचा पीए गाडीतून मंत्रालयात प्रवेश करू शकतो.

मुख्यमंत्री कार्यालयात होणाऱ्या गर्दीमुळे अधिकाऱ्यांना काम करणेही शक्य होत नव्हते. मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना भेटायला येणाऱ्यांची प्रचंड गर्दी सहाव्या मजल्यावर होत होती. त्यामुळे मंत्री आणि सचिवांनाही मुख्यमंत्र्यांना भेटायला त्यांच्या दालनात प्रवेश करताना कसरत करावी लागत होती. त्यामुळे सहाव्या मजल्यावरील गर्दीवरही नियंत्रण आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री कार्यालयात जाण्यासाठी असलेले चारही दरवाजे दुपारी दोन वाजेपर्यंत आतून बंद केले जाणार आहेत.

दोन नंतरच अभ्यागतांना मुख्यमंत्री कार्यालयात रांग लावून प्रवेश दिला जाणार आहे. मंत्रालयात येणारे मंत्रालयातील अधिकारी, बाहेरून मंत्रालयात येणारे अधिकारी, पत्रकार यांना यापुढे गळ्यात ओळखपत्र अडकवून ठेवावे लागणार आहे. गळ्यात ओळखपत्र अडकवलेले नसेल तर त्यांनाही प्रवेश दिला जाणार नाही, असाही नियम करण्यात आला आहे.

निर्बंधांची अंमलबजावणी सुरू

गुरुवारपासून या निर्बंधांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी मंत्रालयात काहीसे गोंधळाचे वातावरण होते. मुख्यमंत्र्यांच्या दालनात अभ्यागतांबरोबर, पत्रकार तर इतर विभागांच्या अधिकाऱ्यांनाही सहज प्रवेश मिळत नव्हता. तर मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही बाहेर पडताना अडचण होत होती. नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री कार्यालयात कामासाठी आलेल्या अभ्यागतांनाही प्रवेश मिळत नसल्याने त्यांनी सहाव्या मजल्यावर गर्दी केली होती.

टॅग्स :एकनाथ शिंदेमंत्रालय