छोट्या नर्सिंग होमचे द्वार आता नॉन कोविड रुग्णांसाठी होणार खुले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 03:40 AM2020-08-25T03:40:48+5:302020-08-25T03:41:06+5:30
पावसाळी आजारांसाठी उपाययोजना; कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने पालिकेचा निर्णय
शेफाली परब-पंडित
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत नियंत्रणात आल्याने बहुतांश रुग्णालयांमध्ये अशा रुग्णांसाठी राखीव खाटा रिकाम्या आहेत. तरीही अनेकदा अन्य आजारांनी त्रस्त रुग्णांना रुग्णालयातून परत पाठविले जात आहे. याची गांभीर्याने दखल घेत आता छोटे नर्सिंग होम, दवाखान्यांमध्ये मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोसारख्या पावसाळी आजाराने त्रस्त रुग्णांना तत्काळ उपचार देण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यावर पालिकेने एप्रिलमध्ये खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा ताब्यात घेतल्या. तेथे केवळ कोरोना रुग्णांवर उपचार देणे बंधनकारक होते. पालिकेच्या विविध उपाययोजनांमुळे कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आला आहे. त्यामुळे कोरोना केअर सेंटर, जम्बो फॅसिलिटी सेंटरमधील हजारो खाटा रिक्त आहेत. पावसात साथीचे आजार वाढण्याची शक्यता आहे. मलेरियाचे रुग्ण गेल्या काही दिवसांत वाढले आहेत. त्यामुळे पालिकेने सुमारे ७० छोट्या नर्सिंग होममधील कोविडसाठी राखीव खाटा अन्य आजारांवर उपचारासाठी वापरण्याची सूट दिली. दरवर्षी आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये मलेरियाचे रुग्ण वाढतात. आतापर्यंत ६०० मलेरिया रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, कॉलरा या साथीच्या आजारांवर उपचारासाठी रुग्णालय सज्ज ठेवणे आवश्यक आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
तत्काळ उपचार मिळणे शक्य
छोट्या नर्सिंग होममधील कोविडसाठी राखीव खाटा आता नॉन कोविड रुग्णांसाठी वापरण्यास सांगण्यात आले आहे. येथे पावसाळी आजारांनी त्रस्त रुग्णांना तत्काळ उपचार मिळू शकतील. - सुरेश काकाणी (अतिरिक्त महापालिका आयुक्त)
७० टक्के खाटा रिकाम्या
रुग्णालयात दाखल एक लाख ३७ हजार ९६ रुग्णांपैकी एक लाख ११ हजार ८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या केवळ १८ हजार रुग्ण सक्रिय असून यापैकी बहुतांशी रुग्णांत लक्षणे नाहीत. त्यामुळे ७० टक्के खाटा रिकाम्या आहेत.