कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी ताज हॉटेलचे दरवाजे खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 07:23 PM2020-04-04T19:23:17+5:302020-04-04T19:23:55+5:30
कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी टाटा समुहाने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला...
कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी टाटा समुहाने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला असून कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी ताज हॉटेलचे दरवाजे खुले केले आहेत. ताज ग्रुपच्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये आता कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना खोल्या मिळणार आहेत.
टाटा सन्सच्या इंडियन हॉटेल्स कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, अहोरात्र सेवा देणारे डॉक्टर्स जर आपल्या कुटुंबीयांसोबत राहिले तर त्यांना इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यांना वेगळं राहण्याची गरज असते. त्यामुळे समुहाने हा निर्णय घेतला आहे. कुलाबा येथील हॉटेल ताज महल, बांद्र्यातलं ताज लँड्स, सांताक्रुजमधलं हॉटेल ताज आणि हॉटेल प्रेसिडंट या हॉटेल्समध्ये डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी या खोल्या देण्यात येणार आहेत. प्रशासन आणि सर्व डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी हा अतिशय दिलासा देणारा निर्णय ठरणार आहे. मुंबईत आधीच जागेची कमतरता असते. त्यामुळे त्यांची सोय कुठे करायची याची चिंता प्रशासनाला होती. या निर्णयामुळे मोठा फायदा होणार आहे.प्रशासन आणि सर्व डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी हा अतिशय दिलासा देणारा निर्णय ठरणार आहे.
ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत मदतीचा हात पुढे केला होता. त्यासाठी नुकतेच टाटा ट्रस्ट आणि उद्योगसमुहाच्या वतीने त्यांनी तब्बल दिड हजार कोटींची मदत देणार असल्याचं जाहीर केली आहे. देश आणि जगासमोरचं संकट हे अतिशय मोठं आहे. त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. ती काळाची गरज आहे. मानवते समोरचं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे असेही रतन टाटांनी म्हटले होते.